Fri, Jul 19, 2019 07:48होमपेज › Konkan › पंधरा राज्यांतील ८५ टक्के खाद्यतेल भेसळयुक्त

पंधरा राज्यांतील ८५ टक्के खाद्यतेल भेसळयुक्त

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 07 2018 10:41PMरत्नागिरी : प्रतिनिधी

‘कन्झ्युमर व्हॉईस’ या स्वयंसेवी ग्राहक संघटनेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशातील 15 राज्यांत विकल्या जाणार्‍या सुट्या खाद्यतेलांपैकी 85 टक्के तेल भेसळयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. मोहरी, तीळ, खोबरेल, सूर्यफूल, पामतेल, सोयाबीन, शेंगदाणा आणि करडई अशा आठ प्रकारांमध्ये भेसळ  करण्यात येते. महाराष्ट्रासह कोकणातही भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती मुंबईतील डर्मेटॉलॉजिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉ. अपर्णा संथनम यांनी  व्यक्त केली आहे.

नॅशनल अ‍ॅक्रेडिटेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिबरेशन लॅबोरेटरिज येथे 1015 नमुन्यांवर या चाचण्या घेण्यात आल्या. त्यासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ यांच्यासोबत भारतातील प्रमुख  15  राज्यांमधून सुटे विकले जाणारे खाद्यतेल परीक्षणासाठी घेण्यात आले. ‘एफएसएसएआय’ने प्रमाणित केलेल्या दर्जा, गुणवत्ता आणि सुरक्षा निकषांच्या आधारे या तेलाची चाचणी करण्यात आली.

भेसळयुक्त तेलामुळे  केवळ  अलर्जी उद्भवते, कोलेस्टेरॉल पातळी  वाढते. तर कर्करोग, पक्षाघात, यकृतातील बिघाड आणि हृदयविकाराचा झटका असे प्राणघातक आजारदेखील उद्भवू शकतात. अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता (अटकाव आणि बंधने विक्री अधिनियम 2011) निकषांनुसार कोणालाही खाद्यतेलांची सुट्या प्रकारामध्ये विक्री करण्यास, विक्रीसाठी तेल उपलब्ध करून देण्यास, वितरण करण्यास, पुरवठा करण्यास मनाई आहे.

खाद्यतेलाबाबतीत नियामक अधिकार्‍यांनी सुटे तेल विकण्यावर बंदी घातली आहे. कारण, अशा सुट्या तेलात भेसळ असू शकते आणि त्यामुळे  शरीरात ‘फ्री रॅडिकल्स’ म्हणून  ओळखल्या जाणार्‍या विषारी घटकांची वाढ होते, असे मुंबईतील डायटेशिअन आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. नीती देसाई यांनी सांगितले. सुट्टे तेल विकणार्‍या व्यक्तीवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

ग्राहकांनी सजग राहण्याची गरज : डॉ. संथनम  

त्वचेवर तसेच केसांसाठी वापरल्या जाणार्‍या तेलाबाबत ग्राहकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. आपली त्वचा अतिशय संवेदनशील असल्याने  किरकोळ  प्रमाणातील भेसळीमुळेसुद्धा त्वचेला खाज सुटणे, आग होणे किंवा अन्य अपाय होऊ शकतो. हे त्रास सुरुवातीला फार मोठे वाटले नाहीत तरी याचे गंभीर दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात, असे डॉ. संथनम यांनी सांगितले.