Wed, Apr 24, 2019 07:49होमपेज › Konkan › साखरपाजवळ 8 हजार किलो काळा गूळ जप्त

साखरपाजवळ 8 हजार किलो काळा गूळ जप्त

Published On: Jul 29 2018 11:13PM | Last Updated: Jul 29 2018 10:58PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

हातभट्टीची गावठी दारू बनविण्यासाठी वापरला जाणारा 8 हजार किलो वजनाचा काळा गूळ राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पकडला. साखरपा-देवरूख फाट्यावर शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. काळा गूळ वाहतुकीसाठी वापरलेला सहा चाकी ट्रक (क्र.एमएच09-एल 190) जप्त करून चालकाला अटक केली आहे. त्याचबरोबर ज्या हातभट्टीधारकाचा हा गूळ होता, त्यालाही देवरूख- पर्शुरामवाडीतील बावनदी किनारी हातभट्टी लावत असताना पकडण्यात आले. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 8 लाख 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार साखरपा-देवरूख मार्गावर गस्त घातली जात होती. यावेळी लाल रंगाचा ट्रक थांबविण्यात आला. या ट्रकच्या पाठीमागील हौद्यात तपासणी केली असता प्रत्येकी 20 किलो वजनाच्या 400 नग काळ्या गुळाच्या ढेपी आढळल्या. 8 हजार किलो वजनाच्या या ढेपींची किंमत 2 लाख 40 हजार इतकी आहे. त्याचबरोबर 50 किलो वजनाच्या साखरेच्या 10 गोणी आढळल्या. या साखरेची किंमत 17 हजार 500 इतकी असून ट्रकसह काळ्या गुळाच्या ढेपी आणि साखर जप्त करण्यात आली. याप्रकरणी चालक तानाजी तुकाराम बंडगर (45, रा. शाहूवाडी, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली.

कारवाई करणार्‍या भरारी पथकाने ट्रक चालकाकडे चौकशी केली असता हा काळा गुळ देवरूख-पर्शुरामवाडी येथील दत्ताराम पर्शुराम नामक गावठी हातभट्टी दारू तयार करणार्‍याचा असल्याचे सांगितले. त्यानुसार बावनदी किनारी छापा मारला असता  दत्ताराम सखाराम पर्शुराम (54, रा. देवरूख-कांगणेवाडी) हातभट्टी लावत असल्याचे आढळले. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली. 36 हजार रुपये किंमतीचे 1800 लिटर रसायन, 1 हजार रुपये किंमतीची 20 लिटर गावठी दारू असा एकूण 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवाईत दोघांना अटक करून 8 लाख 37 हजार 900 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्कचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हातिसकर, राजेंद्र भालेकर, जवान अनुराग बर्वे, विशाल विचारे, सागर पवार, अतुल वसावे यांनी भाग घेतला.