Sun, Jan 19, 2020 21:06होमपेज › Konkan › चिपळुणात रात्रीत ८ घरफोड्या

चिपळुणात रात्रीत ८ घरफोड्या

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 12 2018 10:36PMचिपळूण : खास प्रतिनिधी  

गणेशोत्सवासाठी घर बंद करून गावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी शहरातील चार बंगले तसेच चार सदनिका फोडून लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. या प्रकरणी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, ऐन गणेशोत्सवात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने येथील पोलिसांची झोप उडाली आहे. 

गुरुवारी गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने शहरातील अनेक नागरिक आपल्या सदनिका बंद करून गावी गेले आहेत. हीच संधी साधत चोरट्यांनी  डल्ला मारला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री या 8 घरफोड्या झाल्याचे उघड झाले आहे. शहरातील राधाकृष्ण नगर आणि धामणवणे येथील बंगले आणि सदनिका चोरट्यांनी फोडल्या. यामध्ये राधाकृष्ण नगर येथील सोनिया अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील चार सदनिकांचा समावेश आहे.  संजय हरी देवरुखकर हे आपल्या मुळ गावी कोंड फणसवणे येथे गणेशोत्सवाला गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांची सदनिका फोडून कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यात त्यांचे 2 लाख 19 हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लांबविले. त्यांच्याजवळील जयवंत धोंडू हुमणे यांच्याही सदनिकेतील रोख पाच हजार रुपये चोरून नेले आहेत. तसेच सारिका अभिनव सुर्वे (सध्या रा. पुणे)याची आई विद्या पालांडे या रत्नागिरी येथे गेल्या असता मंगळवारी रात्री चोरट्यांनी त्यांची सदनिका फोडली. शिवाय याच मजल्यावरील महादेव शिंदे यांची सदनिका चोरट्यांनी फोडली. 

याप्रकरणी पोलिस पंचनामा करीत आहेत. सदनिका आणि बंगल्याची मुख्य दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आणि घरातील कपात आणि अन्य समान उपसून किमती ऐवज लांबविला आहे. चोरीच्या या घटनांमध्ये रोख रक्‍कम आणि दागिन्यांचा समावेश आहे.  

चोरट्यांनी गणपती उत्सवाचा फायदा घेत शहर परिसरातील चार  बंगले फोडले आहेत. राधाकृष्ण नगरमधील परशुराम केशव वीरकर आणि राहुल गोविंद गोवळकर यांचे बंद बंगले फोडल्याचे उघड झाले आहे. या शिवाय धामणवणे येथील ‘श्रीयश’ आणि ‘सुयोग’  हे दोन सख्ख्या भावांचे बंगले चोरट्यांनी फोडले आहेत. बंगल्यांचे मालक संतोष गांधी आणि अनिल गांधी हे गणपती उत्सवासाठी आपल्या गावी गेले असताना चोरट्यांनी मंगळवारी रात्री बंगले फोडून चोरी केली. सायंकाळी उशिरा हा प्रकार लक्षात आल्यानंतर गावी गेलेले गांधी बंधू घटनास्थळी दाखल झाले. 

या प्रकरणी सायंकाळी पंचनामा सुरु करण्यात आला. ऐन सणासुदीच्या दिवसातच आठ घरफोड्या झाल्यामुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. मात्र, चोरट्यांनी यामध्ये नेमका किती रुपयांचा डल्ला मारला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. तपासासाठी सायंकाळी श्‍वानपथक आणि ठसे तज्ज्ञ पाचारण करण्यात आले आहेत. यासंदर्भात पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ अधिक तपास करीत आहेत.

दोन मोटारसायकलीही लांबवल्या

शहरातील राधाकृष्ण नगर भागातील बंगले आणि सदनिका फोडून चोरी झाली असताना याच भागातील दोन मोटारसायकलीही चोरीस गेल्या आहेत. येथील श्री गणेश अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रमोद कदम आणि त्यांच्या समोरच्या इमारतीत राहणारे दिलीप चव्हाण यांच्या दोन पल्सर मोटारसायकली चोरट्यांनी मंगळवारी रात्री लांबविल्या. यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे. ऐन गणेशोत्सवात चोरट्यांनी डोके वर काढल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.