Fri, Apr 26, 2019 20:15होमपेज › Konkan › जिल्ह्यात ७८ तीव्र तर ६७८ कुपोषित बालके

जिल्ह्यात ७८ तीव्र तर ६७८ कुपोषित बालके

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 01 2018 11:14PMओरोस : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्‍त  करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात 78 तीव्र  तर 678 कुपोषित बालके असल्याची बाब बालविकास समिती सभेत उघड झाली.कुपोषित मुलांची शोध मोहीम सुरु असून ही आकडेवारी वाढण्याची शक्यता असल्याचेही सभेत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान कुपोषित मुलांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यात 55 ठिकाणी ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यात आले असल्याची माहिती सभेत देण्यात आली.

जि.प.महिला व बाल विकास समिती सभा येथील बॅ नाथ पै समिती सभागृहात सभापती सायली सावंत यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. महिला व बाल विकास अधिकारी प्रणवकुमार चटलवार,सदस्या शर्वाणी गावकर, राजलक्ष्मी डिचवलकर, माधुरी बांदेकर, श्‍वेता कोरगावकर, संपदा देसाई, पल्लवी राऊळ, पल्लवी झिमाळ, तालुका बाल विकास अधिकारी आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्‍त करण्यासाठी जि.प.प्रशासन आणि महिला व बाल विकास विभाग प्रयत्न करत आहे.जिल्ह्यात कुपोषित मुलांची शोध मोहीम सुरु असून कुपोषित मुलांच्या औषधांचा खर्च रुग्ण कल्याण समितीमधून करण्यात यावा अशा सुचना करण्यात आल्या.

महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येणार्‍या विविध लाभाच्या योजनांचे धनादेश वेळेत वटविण्यात येत नसल्यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा सदस्या श्‍वेता कोरगावकर यांनी  उपस्थित केला. यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक वगळता इतर बँका धनादेश वटविण्यास वेळ लागत असल्याचे अधिकर्‍यांनी सांगितले. इतर बँका सहकार्य करत नसल्यास लाभार्थ्यांनी  जिल्हा बँकेत खाते असलेला नंबर दयावा,असे आवाहन सभापती सायली सावंत यांनी केले.

महिला व बाल विकास विभागामार्फत वैयक्‍तीक स्वरुपाच्या अनेक योजना राबविल्या जात असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले.तालुक्यातून अपूर्ण प्रस्ताव जिल्हस्तरावर सादर करू नयेत, असे आदेशही सभापती सायली सावंत यांनी दिले. 

511 अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीविना

511 अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही.त्यामुळे या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच घरगंटीसाठी 11 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी 10 पात्र ठरले आहेत तर शिलाई मशीनच्या 6 प्रस्तावापैकी  5 पात्र तर सायकलसाठी 5 प्रस्तावांपैकी  4 पात्र ठरले असल्याची माहिती  देण्यात आली.