Mon, Jun 17, 2019 03:14होमपेज › Konkan › ‘पदवीधर’साठी जिल्ह्यात ७८.१४ टक्के मतदान

‘पदवीधर’साठी जिल्ह्यात ७८.१४ टक्के मतदान

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:42PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातून 78.14 टक्के इतके मतदान झाले. जिल्ह्यातील 16 हजार 222 मतदारांपैकी 12 हजार 950 पदवीधर मतदारांनी हक्क बजावला. विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीने पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गुरुवारी मतमोजणी होणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही प्रमुख पक्षांनी फारच प्रतिष्ठेची केल्याचे चित्र मतदानावेळी दिसून आले. यापूर्वी कधीही दिसून न येणारी जय्यत तयारी या निवडणुकीवेळी दिसून आली. प्रमुख तिन्ही पक्षांचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपआपल्या उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करीत होते.

मतदान केंद्रांच्या ठिकाणी या पक्षांचे बूथ लागले होते. प्रत्येक बूथवर आणि मतदान केंद्रांच्या ठिकाणी त्या-त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती. सकाळपासून पाऊस असतानाही मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी जाणार्‍या मतदारांचे मोबाईल बाहेरच जमा करुन घेतले जात होते. मतदान करुन आल्यानंतर ते मोबाईल परत केले जात होते.

मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे दुसरे एक उदाहरण म्हणजे रत्नागिरी तहसीलदार कार्यालय आणि महिला विद्यालय येथील मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदार आपआपली वाहने घेऊन येत-जात होते. त्याचबरोबर वाहने पार्किंग करुन ठेवली जात होती. त्यामुळे या दोन्ही मतदान केंद्रांच्या ठिकाणाहून येणारी-जाणारी वाहतूक खोळंबली जात होती. सकाळी 7 वा. मतदान सुरु झाल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ट्रॅफिक जाम होत होते.

कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत भाजपचे अ‍ॅड. निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुुल्ला, शिवसेनेचेे संजय मोरे यांच्यातच आहे. या मतदारसंघात 1 लाख 4 हजार 264 मतदार आहेत. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यात 16 हजार 222 मतदार असून, 26 मतदान केंद्रांवर 12 हजार 950 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी विजयाचा विश्‍वास व्यक्त केला. 28 जून रोजी नवी मुंबईतील आग्रे कोळी संस्कृती भवनात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे.

विधानसभेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखली जात आहे. या निवडणुकीच्या निकालावर आगामी विधानसभेचा कल काय असेल याचा अंदाज बांधला जाणार आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेने ही निवडणूक फारच प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे कधी नव्हे ती प्रचाराची धामधूमही या निवडणुकीत पहावयास मिळाली.