Sun, May 26, 2019 17:00होमपेज › Konkan › कणकवलीत 77 टक्के मतदान

कणकवलीत 77 टक्के मतदान

Published On: Apr 06 2018 11:38PM | Last Updated: Apr 06 2018 10:53PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या 17 पैकी 16 जागांसाठी शुक्रवारी उत्स्फूर्तपणे 76.97 टक्के मतदान झाले. एकूण 11 हजार 816 मतदारांपैकी 9 हजार 95 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. विशेष म्हणजे राजकीयद‍ृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवलीत कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यामुळे नागरिकांसह पोलिस यंत्रणेनेही सुटकेचा नि:श्‍वास टाकला. आता प्रभाग 10 ची निवडणूक 11 तारीखला होणार असून सर्वच मतमोजणी एकत्रितपणे 12 एप्रिलला होणार आहे.  दरम्यान, उत्स्फूर्तपणे झालेल्या या मतदानाचा फायदा कुणाला होतो याबाबतचे राजकीय तर्क-वितर्क  सुरू झाले आहेत.

शुक्रवारी सकाळी 7.30 वा. मतदानास प्रारंभ झाला. सहा इमारतींमधील 16 केंद्रांवर मतदान प्रक्रिया  पार पडली. शिवसेना, भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान, काँग्रेस आणि कणकवली गाव विकास आघाडी यांनी त्या त्या मतदान केंद्राच्या बाहेर आपले बुथ लावले होते. मात्र, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण दिवसभर निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेनेचे आ.वैभव नाईक, सुशांत नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल रावराणे, नगराध्यक्षपदाचे युतीचे उमेदवार संदेश पारकर तसेच आ.नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत, सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम यांच्यासह सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.

विशेषत: महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बुथवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. जास्तीतजास्त मतदारांना मतदानासाठी बाहेर काढले जात होते. वृध्द, अपंग आणि आजारी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी वाहनांची सोय केली होती. सकाळच्या सत्रात पहिल्या फेरीत 16.33 टक्के इतके मतदान झाले. दुसर्‍या फेरी अखेर 35.94 टक्के मतदान झाले. तर तिसर्‍या फेरी अखेर दुपारी दीड वाजेपर्यंत 53.85 टक्के मतदान झाले होते. यामध्ये जवळपास 6,363 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारपर्यंत सर्वांत जास्त मतदान प्रभाग 2 मध्ये 64.85 टक्के झाले होते. सायंकाळी साडेतीन पर्यंत 63 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी 4 नंतर पुन्हा मतदानाचा वेग वाढला. सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर एकूण 76.97 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये पुरूषांच्या मतदानाची टक्केवारी 79.97 टक्के तर स्त्री मतदानाची टक्केवारी 74.04 टक्के एवढी होती. सर्वाधिक मतदान प्रभाग 2 मध्ये 84.65 टक्के तर सर्वात कमी मतदान प्रभाग 15 मध्ये 68.89 टक्के  झाले. प्रभाग 1 मध्ये 79.62 टक्के , प्रभाग 3 मध्ये 73.42 टक्के , प्रभाग 4 मध्ये 73.51टक्के , प्रभाग 5 मध्ये 73.19 टक्के , प्रभाग 6 मध्ये 80.50 टक्के , प्रभाग 7 मध्ये 81.65 टक्के  प्रभाग 8 मध्ये 83.78 टक्के , प्रभाग 9 मध्ये 78.56 टक्के , प्रभाग 11 मध्ये 74.04 टक्के , प्रभाग 12 मध्ये 79.54 ट प्रभाग 13 मध्ये 70.17 टक्के, प्रभाग 14 मध्ये 74.67 टक्के, प्रभाग 16 मध्ये 80.69 टक्के, प्रभाग 17 मध्ये 71.51 टक्के मतदान झाले. 

कोकण उपायुक्‍त अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी  सौ. नीता सावंत शिंदे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने, अवधुत तावडे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. तर कायदा व सुव्यवस्था चोख राहण्यासाठी प्रभारी डीवायएसपी दयानंद गवस आणि कणकवलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ही मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. प्रभाग 10 ची निवडणूक 11 तारीखला होणार असून 12 तारीखला होणार्‍या मतमोजणीकडे आता सार्‍यांचेच लक्ष लागले आहे.

Tags :  Outing,  Kankavli, Election