होमपेज › Konkan › ‘ग्रामसडक’च्या ७५० कंत्राटी कर्मचार्‍यांना ५ वर्षे वेतनवाढ नाही

‘ग्रामसडक’च्या ७५० कंत्राटी कर्मचार्‍यांना ५ वर्षे वेतनवाढ नाही

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:31PMरत्नागिरी : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सद्य:परिस्थितीत मुख्यमंत्री तथा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे फार मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. राज्याचा चेहरामोहरा बदलणारी ही योजना असून त्याचा प्रचार शासन करीत आहे. परंतु, शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी होण्यासाठी राबणारे कंत्राटी कर्मचारी कमी पगारात व अपुर्‍या सुविधेत काम करीत आहेत. योजनेत सुमारे 750 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांना जुलै 2012 पासून वेतनात वाढ मिळालेली नाही. तरीही हे कर्मचारी अतिशय कमी वेतनावर आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे ‘समान काम समान वेतन’ देण्याचे आदेश असूनही या कर्मचार्‍यांच्या वेतनात तीळमात्र वाढ झालेली नाही. तसेच संविधानात महिला कर्मचार्‍यांना प्रसुती रजा मिळण्याचा हक्‍क आहे, तोही शासनाने हिरावला आहे. कर्मचार्‍यांना कामावर असताना अपघात झाल्यास कोणतेही विमा संरक्षण नाही, अल्प प्रवासभत्त्यात स्वखर्चाने क्षेत्रीय कर्मचार्‍यांना साईटवर जावे लागते, नैमित्तिक रजा वर्षातून फक्‍त 6  तसेच आजारी पडल्यावर कोणत्याही वैद्यकीय रजा नाहीत. त्यामुळे वाढती महागाई व तुटपुंजे वेतन यांची सांगड घालणं कठीण झाले आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप या विषयावर आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे राज्यभरात योजनेत कार्यरत सर्व कर्मचार्‍यांनी दि. 15 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.