Fri, Feb 22, 2019 09:52होमपेज › Konkan › मच्छीमारांच्या जाळ्यात सापडले ७० टन मासे 

मच्छीमारांच्या जाळ्यात सापडले ७० टन मासे 

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 9:43PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

‘ओखी’ वादळाच्या तडाख्यातून सावरलेल्या किनारपट्टीवरील नुकसानग्रस्त मच्छीमारांना तारली मासळीने ‘तारल्या’चे चित्र रविवारी मालवण किनारपट्टीवर दिसून आले. वादळाच्या तडाख्यात होडी फुटून व जाळी तुटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या जाळीत 100 खंडीपेक्षा जास्त (सुमारे 70 टन) तारली मासळी मिळाल्याने लाखो रुपये मच्छीमारांच्या पदरात जमा झाले आहेत. 

किनारपट्टीवर (वायरी) रापण संघाच्या रापण जाळीत रविवारी सकाळी सापडलेली बंपर तारली मासळी सायंकाळी उशिरापर्यंत एकत्र करण्याचे काम शेकडो मच्छीमारांच्या वतीने सुरू होते. वायरी येथील नारायण तोडणकर यांचा पारंपरिक रापण संघ आहे. अनेक मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो. ओखी वादळाच्या तडाख्यात या रापण संघाची होडी समुद्रात बुडून फुटली. तर जाळी तुटून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासन मदतीच्या प्रतीक्षेत तोडणकर यांच्यासह अनेक मच्छीमार आहेत. या स्थितीत तोडणकर रापण संघाच्या वतीने रविवारी वायरी किनारपट्टीवर रापण लावण्यात आली. या रापणीत 100 खंडीपेक्षा जास्त तारली मासळी मिळाली. 

काही किलोमीटर लांब असलेल्या रापणीचे जाळे मासळीने भरून गेल्याने वाहून जाणार्‍या मासळीचा खच किनारपट्टीवर पसरला होता. शेकडो मच्छीमारांच्या मदतीने ही मासळी वेंगुर्ले येथील आकाश फिश मिल तसेच जिल्ह्याबाहेरील मत्स्य केंद्रांवर पाठविण्यात येत होती. रापण जाळीत मिळाल्याचे मोजमाप करणेही कठीण बनले होते.