Wed, Jun 26, 2019 11:27होमपेज › Konkan › जिल्ह्यातील 61 कन्यांना ‘भाग्यश्री’चा होणार लाभ

जिल्ह्यातील 61 कन्यांना ‘भाग्यश्री’चा होणार लाभ

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 11:23PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेनुसार ‘माझी कन्या भाग्यश्री’ (सुधारित) योजनेला सुरुवात करण्यात आली. या योजनेला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने 61 लाभार्थींना अनुदान दिले जाणार आहे.

पूर्वीच्या सुकन्या फक्‍त दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांनाच याचा लाभ घेता येत होता. या योजनेतील दारिद्य्ररेषेखालील उत्पन्नाची अट शिथिल करून नामकरण केलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक किंवा दोन मुली जन्मलेल्या 61 पालकांना यातून 30 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत. राज्यात मुलींचे शिक्षण व आरोग्य यात सुधारणे करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलाइतका मुलींचा जन्मदर वाढविणे यासाठी सुकन्या योजना 1 जानेवारी 2014 ला दारिद्य्ररेषेखाली जन्मणार्‍या मुलींसाठी लागू केली होती. 

त्यातील उत्पन्न कमी असल्याने अनेक लाभार्थी यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे 1 ऑगस्ट 2017 ला सुकन्या योजनेची ‘माझी कन्या भाग्यश्री’ असे नामांकन करण्यात आले. त्यातील निकष बदलून उत्पन्नाची मर्यादा साडेसात लाख रुपयांपर्यंत केली गेली. तसेच सुकन्या योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा 2017-18 या आर्थिक वर्षातील नवीन योजनेत सामावून घेण्याचा निर्णय देण्यात आला.भाग्यश्री योजनेत एक मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे पन्नास हजार रुपये तर दोन मुलींनंतर नियोजन केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी 25 हजार रुपये ठेवण्याची तरतूूद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 17-18 या आर्थिक वर्षात 61 तर 18-19 साठी 3 प्रस्ताव आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षातील प्रस्तावांना लाभ देण्यासाठी संबंधितांची बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत खाती उघडण्याचे काम सुरु आहे. लाभार्थींसाठी निधी आला असून त्याचे वितरणही तत्काळ केले जाईल.