Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Konkan › राजापुरात डेंग्यूसदृश ६ रुग्ण 

राजापुरात डेंग्यूसदृश ६ रुग्ण 

Published On: Jul 17 2018 11:00PM | Last Updated: Jul 17 2018 10:55PMराजापूर : प्रतिनिधी

शहरानजीक कोदवली, साईनगरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूसदृश रुग्ण सापडले असून येथील ग्रामीण रुग्णालयासहित अन्य एका खासगी रुग्णालयात प्रत्येकी तीन - तीन  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, साईनगर परिसरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढत आहे. देशात स्वच्छतेबाबत जोरदार जनजागृती सुरु असतानाच राजापुरात मात्र बोजवारा उडाला आहे.

शहर व कोदवली ग्रामपंचायत यांना जोडणारा साईनगर हा महत्त्वाचा भाग असून गेल्या महिन्यांपासून येथील स्वच्छतेचा पुरताच बोजवारा उडाला आहे. त्यामुळे शहरात वेगाने फैलावत असलेल्या डेंग्यूच्या साथीची सुरवात याच साईनगरातून झाल्याची माहिती पुढे आली आहे. या परिसरात असलेल्या अनेक निवासस्थानांमध्ये महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेले तहसीलदारांचे निवासस्थान असून सध्या त्याचा वापर होत नसल्यानेच  त्याच्या अवतीभवती घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. आवारात रान रुजले असून आतील घाणीसह त्याच्या गेटबाहेरच्या समोर तर रस्त्यालगतच  मोठ्याप्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. मात्र, या शासकीय निवासाकडे येथील तहसील प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे.

या परिसरात टायरवाले, भंगारवाले अशांचाही वावर वाढल्याने त्यामुळेही या भागातील अस्वच्छता अधिक वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने येथील भंगारवाल्यांसह टायरवाल्यांना नोटीसा देऊन परिसरात कुठे अस्वच्छता राहणार नाही, याची खबरदारी घ्या अशा सक्त सूचनादेखील दिल्या आहेत. तर ही साथ पसरु नये, यासाठी आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

यापूर्वी कोदवली साईनगरात डेंग्युचे काही संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर येथील आरोग्य विभागाकडून त्यांची तपासणी केली गेली होती. त्यांपैकी एक रुग्ण डेंग्यूचा असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्यावर रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात उपचार  झाल्यावर तो पूर्ण बरा झाला होता. अन्य सापडलेले  संशयितदेखील उपचारानंतर बरे होऊन घरी परतले होते. मात्र, तरीही साईनगर परिसरात त्यानंतरदेखील डेंग्यू सदृश संशयित रुग्ण सापडले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती येथील आरोग्य विभागाकडून मिळाली.  सध्या राजापूर ग्रामीण रुग्णालयात व अन्य एका खासगी रुग्णालयात प्रत्येकी तीन संशयितांना दाखल करण्यात आले आहे.

शहरवासीयांची झोप उडाली 

साईनगरातील अशा वाढत असलेल्या  अस्वच्छतेमुळे नेमकी याच परिसरात डेंग्यूची साथ सुरु झाली असून ती आता शहराच्या विविध भागात पसरत असल्याने समस्त शहरवासीयांची पुरतीच झोप उडाली आहे.