Thu, Apr 25, 2019 08:07होमपेज › Konkan › पंचावन्न लाखांची सुपारी ट्रकचालकाने परस्पर विकली

पंचावन्न लाखांची सुपारी ट्रकचालकाने परस्पर विकली

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 10:27PMचिपळूण : खास प्रतिनिधी

अहमदनगरला सुपारी घेऊन जाणारा ट्रक चालकाने क्लीनरला मारहाण करून नाशिकमध्ये त्यातील सुपारी परस्पर विकली. या प्रकरणी ट्रक चालक इम्तिजार शेख (रा. माणगाव) याच्याविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तब्बल 55 लाखांची सुपारी या चालकाने परस्पर विकली. तसेच 25 लाख रुपये किमतीचा ट्रक नाशिकमध्ये ठेवून तो पसार झाला. त्यामुळे 80 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत गोवळकोट रोड येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक युसूफअली दळवी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून चालक इम्तिजार शेख हा दि. 5 मे रोजी मंगलोर येथून ट्रकमध्ये सुपारी भरुन निघाला. दि. 7 मे रोजी हा ट्रक चिपळूण येथे दाखल झाला. या नंतर तो अहमदनगरकडे रवाना झाला. मात्र, चालक इम्तिजारने नाशिक येथे ट्रक थांबवून क्लिनर लक्ष्मण (रा. खेड) याला जबर मारहाण केली आणि ट्रकमधील 55 लाख रुपये किमतीची सुपारी परस्पर विकली व ट्रक नाशिकमध्येच सोडून त्याने पलायन केले. सध्या ट्रक नाशिकमध्येच असून क्लिनर उपचार घेत आहे. याप्रकरणी दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.