Sat, Aug 24, 2019 23:17होमपेज › Konkan › जिल्ह्यातील ५४० लोककलाकारांना मानधन

जिल्ह्यातील ५४० लोककलाकारांना मानधन

Published On: Jul 28 2018 1:34AM | Last Updated: Jul 27 2018 11:40PMरत्नागिरी : प्रतिनिधी

लोककलेच्या माध्यमातून ज्यांनी संस्कृतीचे जतन करत मनोरंजन व समाजप्रबोधन केले अशा कलाकारांना शासनातर्फे दर महिन्याला मानधन देण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील 540 वृद्ध कलाकार आणि साहित्यिकांना याचा लाभ होत आहे. 

लोककलेची परंपरा जतन करणार्‍या लोककलाकारांना मानधन देण्याची सुरुवात 30 वर्षांपूर्वी सांस्कृतिक मंत्रालयाने केली. सन 2012-13 पासून दरमहा मानधन देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज गटसचिवांद्वारे जिल्हा समाजकल्याण अधिकार्‍यांकडे सादर करावा लागतो.  सुरुवातीला अ, ब, क  वर्गवारीनुसार 700, 600  व 500 रुपये मानधन मिळत होते. नंतर त्यात वाढ करून 1 हजार 400, 1 हजार 200  व 1 हजार रुपये मानधन देण्यात येत होते. 

ऑगस्ट 2014 पासून त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून, आता 2 हजार 100, 1 हजार 800 आणि 1 हजार 500 रुपये मानधन वर्गवारीनुसार देण्यात येत आहे. पूर्वी हे मानधन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येत होते. एप्रिल 2015 पासून मंत्रालयातून थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. लोककलाकारांच्या आलेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी  जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याची समिती स्थापना करण्यात आली आहे.

या समितीत अशासकीय सदस्यांचा समावेश असतो. एकदा स्थापन झाल्यावर ही समिती तीन वर्षे कार्यरत असते. या समितीत चिपळूणचे प्रकाश देशपांडे आणि प्रकाश काणे, दापोलीचे अरविंद जाधव, लांजाचे शरद चव्हाण, रत्नागिरीतील अनिल दांडेकर आणि डॉ. दिलीप पाखरे यांच्या समावेश असून अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असतात. मानधन मिळण्यासाठी लाभार्थी कलाकाराचे वय 50 पेक्षा जास्त तसेच वार्षिक उत्पन्न 48 हजारांच्या आत असणे आवश्यक आहे.

जाखडी, नमन, भजन, शाहीर याबरोबरच सर्वच लोककलांतील निकषात बसणार्‍या कलाकारांना शासनाकडून मानधन देण्याची योजना आहे. दरवर्षी 60 प्रस्तावांना मान्यता देण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी एकूण 45 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यातील 24 प्रस्ताव परिपूर्ण असून, उर्वरित 21 प्रस्ताव त्रुटींच्या पूर्ततेसाठी पुन्हा पाठवण्यात आले आहेत.  या मानधन योजनेचा कोकणातील कलाकारांनी लाभ  घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.