Sun, Mar 24, 2019 04:11होमपेज › Konkan › कॅनडामध्ये नोकरीचे आमिष दाखवत ५४ हजाराला गंडा

कॅनडामध्ये नोकरीचे आमिष दाखवत ५४ हजाराला गंडा

Published On: Jun 29 2018 12:06AM | Last Updated: Jun 28 2018 10:17PMकणकवली : प्रतिनिधी

बेंगलोर येथील एका कंपनीच्या नावाने कॉल करून कॅनडा येथे हॉटेलमध्ये नोकरी देतो, असे आमिष दाखवत मेडिकल फी आणि विमानाच्या तिकिटाच्या फीसाठी सुमारे 54 हजार रुपये आपल्या बँक खात्यावर भरायला लावत तरुणाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. सागर सुमन कारेकर (वय 23, रा. कणकवली-विद्यानगर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्या तरुणाच्या तक्रारीवरून बचत खाते क्रमांकासोबत नाव दिलेल्या व्यक्‍तीविरुद्ध कणकवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

सागर कारेकर याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. तो एका ठिकाणी एका कंपनीत हॉटेल मॅनेजमेंटकरिता नोकरीस होता. 11 फेब्रुवारी 2018 रोजी तो नोकरी सोडून कणकवलीला घरी आला. त्याला नोकरी नसल्याने दरम्यानच्या काळात तो नोकरी शोधत होता. फेब्रुवारी 2018 मध्ये त्याने नोकरी डॉट कॉम मध्ये त्याचे प्रोफाईल अपडेट केले होते. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2018 रोजी त्याच्या मोबाईलवर बेंगलोर येथील एका कंपनीच्या नावाने एका अज्ञात व्यक्‍तीने कॉल करून त्याला कॅनडा येथे हॉटेल मॅनेजमेंटसंबंधी नोकरी देतो असे सांगितले.

त्यासाठी मेडिकल फी 5333 रू. भरावे लागतील, असे सांगितले आणि त्याने त्याचा एसबीआय खाते क्रमांक विष्णू वर्धन के. यांच्या नावे असलेला दिला. आपल्याला आता नोकरी मिळणार या आशेने सागर कारेकर याने त्या खात्यावर 1 मार्च 2018 रोजी नेट बँकिंगद्वारे 5333 रू. मेडिकल फी भरली. त्यानंतर 3 मार्च रोजी द वेस्टर्न हॉटेल यांच्याकडून जॉब ऑफर लेटर त्याला आले. त्याबाबत त्यांनी त्याच्या ईमेलवर त्याच्या पासपोर्टची झेरॉक्स कॉपी 4 मार्च रोजी देणे तसेच विमानाचे तिकिट फी 48 हजार 849 रू. 5 मार्च रोजी देणे त्यात त्याचा पगार 3 हजार कॅनेडीयन डॉलर इतका असेल असे कळवले.

7 मार्च रोजी त्याची वैद्यकीय तपासणी होणार आहे. 8 मार्च रोजी त्याचा व्हिसा इंटरव्ह्यू असेल, अधिक माहितीसाठी एक नाव व नंबर ईमेलवर दिला. त्याप्रमाणे सागर याने 3 मार्च रोजी विष्णू वर्धन के. यांच्या नावावर असलेल्या एसबीआयच्या बचत खात्यामध्ये 10 हजार रू. भीम अ‍ॅप या नेटबँकिंगद्वारे तसेच 4 मार्च रोजी सायंकाळी त्याच एसबीआय बचत खात्यात 20 हजार रू. व काहीवेळाने 18 हजार 849 रू. भीम अ‍ॅप या नेटबँकिंगद्वारे भरले. 7 मार्च 2018 रोजी सागर याने त्याला ईमेलवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल करून विचारणा केली असता जॉबची मेडिकल टेस्ट व व्हिसा इंटरव्ह्यू पुढे ढकलली आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर 15 दिवस थांबून सागर याने पुन्हा त्याच नंबरवर कॉल केला. परंतु त्यांनी जॉब संदर्भात काहीच उत्तर दिले नाही. 

त्यावरून आपली अज्ञात व्यक्‍तीने कॅनडा येथे नोकरीला लावतो असे सांगून आपल्याकडून खात्यावर सुमारे 54 हजार रु. भरून घेऊन फसवणूक केल्याचे सागरच्या लक्षात आले. तरीही त्याने आपल्याला त्या कंपनीकडून जॉब संदर्भात कॉल येईल याची वाट पाहिली. मात्र, 28 जूनपर्यंत नोकरी संदर्भात त्या कंपनीकडून कॉल आलेला नसल्याने त्याने बचत खाते क्रमांक ज्याच्या नावे होते त्या व संपर्कासाठी नाव दिलेल्या व्यक्‍ती विरूध्द फसवणूक झाल्याची तक्रार त्याने कणकवली पोलिसात नोंदविली आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी करत आहेत.