कुडाळ : प्रतिनिधी
आजूबाजूच्या उपलब्ध गोष्टींतून स्थानिकांना अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून दिला, तर प्रभावीपणे पर्यावरण संवर्धन होते. शिवाय, रोजगारनिर्मितीही होते आणि पर्यावरणाच्या समस्याही सुटतात. कासव संवर्धनातून पर्यटन व्यवसाय उभारला गेला आहे. वेंगुर्ल्यात कचरा संकलन आणि व्यवस्थापनातूनही अर्थार्जन होत आहे. बांबू संशोधनातून आणि उद्योजगांतून लोकांना रोजगाराचे साधन दिले जात आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला अर्थार्जनाची जोड मिळायला हवी, असा सूर परिसंवादात उमटला.
वसुंधरा विज्ञान केंद्रात आयोजित मराठी विज्ञान परिषदेच्या 52 व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात ‘सागरी परिसंस्था’ आणि पर्यावरण संवर्धन याविषयी परिसंवाद झाले. सागरी परिसंस्था
परिसंवादात सिंधुदुर्गातील सागरीजीव, त्यांचा सहसंबध व नष्ट होत चाललेल्या सागरी प्रजाती याविषयी चर्चा झाली.
पर्यावरणाची काळजी घ्याः डॉ. इंगोले
राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे उपसंचालक डॉ. बबन इंगोले यांनी सागरी प्रदूषण व जैविक संपदा, गोदरेज अॅण्ड बॉईसच्या कांदळवन प्रकल्पाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत देशपांडे यांनी कांदळवनातील परिसंस्था व संवर्धन आणि युवा संशोधक मयुरेश गांगल यांनी सिंधुदुर्गातील मत्स्यव्यवसाय यावर मार्गदर्शन केले.जैविक संपदा वाचवायची असेल, तर सागरी प्रदूषण रोखायला हवे. नदीच्या, समुद्राच्या पाण्यात कचरा, प्लास्टिक जाणार नाही, याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यायला हवी, असे डॉ. बबन इंगोले यांनी सांगितले. माशांची संख्या कमी झाल्याने सिंधुदुर्गातील मत्स्यव्यवसाय तोट्यात आला आहे. अनेक मत्स्य व्यावसायिक इतर व्यवसायाकडे वळू लागले आहेत. मत्स्य व्यवसायात तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन आल्याने सुधारणा झाली आहे. मात्र, माशांची संख्या वाढणे गरजेचे आहे, असे मयुरेश गांगल यांनी सांगितले. कांदळवनातील परिसंस्था कोकणच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असून, त्याचे संवर्धन करणे क्रमप्राप्त आहे, असे लक्ष्मीकांत देशपांडे यांनी नमूद केले.
ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन करणारे भाऊ काटदरे यांनी कासव संवर्धन आणि पर्यटन व्यवसाय याची सांगड कशी घातली, याविषयीचे अनुभव कथन केले. जैवविविधता संवर्धनासोबत या क्षेत्रातील कायद्यांविषयी डॉ. असीम सरोदे यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी हरित न्यायाधिकरण महत्त्वाची संस्था आहे. सामान्य माणूसही पर्यावरण रक्षणाचा खटला लढू शकतो, असे ते म्हणाले. सायंकाळी बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळातर्फे नाट्य सादरीकरण झाले.