Sat, Aug 24, 2019 21:57होमपेज › Konkan › ठेकेदारास 50 लाखांचा दंड

ठेकेदारास 50 लाखांचा दंड

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:35PMवैभववाडी : प्रतिनिधी

नावळे येथे बेकायदा उत्खनन प्रकरणी ठेकेदार ए.पी.सावंत यांना महसूल विभागाने 50 लाखांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.  

या घटनेबाबत माहिती अशी की, नावळे येथील प्रताप भिकाजी रावराणे यांनी आपल्या नावळे येथील गट क्र.286 मध्ये बेकायदा उत्खनन करून काळा दगड व मातीचे सुमारे 500 ट्रक नेल्याची तक्रार तहसीलदार संतोष जाधव यांच्याकडे केली होती. यानुसार जाधव यांनी मंडळ अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश  दिले होते.  यानुसार मंडळ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्या अहवालानुसार रावराणे यांच्या जमिनीत 509.97 ब्रास काळा दगड व 59.57 ब्रास मातीचे उत्खनन झालेचे अहवालात म्हटले आहे.  हे उत्खनन नावळे-सांगुळवाडी रस्त्याचे काम करणारे ठेकेदार ए.पी.सावंत यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे.  त्यानुसार 505.49 काळा दगड उत्खनन केल्याप्रकरणी रॉयल्टीसह 47 लाख 1 हजार 50 रुपये तर 59.57 ब्रास माती उत्खनन केल्यामुळे 3 लाख 8 हजार 76 रुपये असा एकूण 50 लाख 9 हजार 729 रुपये दंडाची नोटीस कणकवली तहसीलदारांमार्फत बजावण्यात आली आहे.  आतापर्यंतची ही मोठी कारवाई आहे.