Tue, Apr 23, 2019 18:05होमपेज › Konkan › कारमध्ये सापडल्या 50 लाखांच्या जुन्या नोटा

कारमध्ये सापडल्या 50 लाखांच्या जुन्या नोटा

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 10:52PMमालवण : प्रतिनिधी

मुंबईहून मालवण येथे येणार्‍या मुंबईस्थित व्यक्‍तींच्या हुंडाई एक्सेंट गाडीमध्ये चलनातून रद्द झालेल्या सुमारे 50 लाख रुपयांच्या जुन्या नोटांची रोकड सापडल्याची घटना सोमवारी (दि.30) दुपारी 3 वा. सुकळवाड-पाताडेवाडी येथे घडली. याप्रकरणी मालवण पोलिसांनी सुधीर शांताराम खामकर (वय 53, लांजा-रत्नागिरी), मारुती तुकाराम मुटल (48, बेलापूर-ठाणे), नितीन नंदकुमार गावडे (33, घनसोली-नवी मुंबई), बीरबल कुमार गुप्‍ता (21, विक्रोळी) या चौघांना कारसह ताब्यात घेतले. त्यांच्यावर स्पेसिफाईड बँक नोट अ‍ॅक्ट 2007  कलम 5, 7 अन्वये मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी पोलिस उपनिरीक्षक अमोल साळुंखे यांनी गुप्तहेराच्या सहाय्याने ही करवाई केली. या कारवाईमुळे मालवणात नोटाबंदी पूर्वीच्या जुन्या नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नोटा कोणत्या कारणासाठी आणलेल्या, त्या नोटा कुठे नेत होत्या याबाबत संबंधितांकडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मुंबई येथील काही व्यक्‍ती मुंबईहून मालवणच्या दिशेने हुंडई कारमधून जुन्या नोटांची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार मालवण पोलिसांचे पथक ओरोसच्या दिशेने निघाले. सोमवारी दुपारी 3 वा. च्या सुमारास सुकळवाड बाजारपेठेपासून 1 कि.मी. अंतरावरील पाताडेवाडी येथे हुंडई एक्सेन्ट कार मालवण पोलिसांना आढळून आली. या कारची तपासणी केली असता कारमधील सीटवर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एक हजार रूपयाच्या सुमारे 50 लाख रूपयांच्या नोटा आढळून आल्या.ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अमोल साळुंखे, मंगेश माने, विल्सन फर्नांडिस, व खडपकर यांनी केली.मंगळवारी या गुह्याच्या चौकशीसाठी कोल्हापूर येथील इन व्हेस्टीकेशन डिपार्टमेंटचे पथक येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Tags : Konkan, 50, lakh, old, notes, found, car