Fri, Jan 24, 2020 23:20होमपेज › Konkan › टंचाईग्रस्त भागात 50 विंधन विहिरी

टंचाईग्रस्त भागात 50 विंधन विहिरी

Published On: Jun 24 2019 1:31AM | Last Updated: Jun 24 2019 1:31AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील टंचाई निवारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे विंधन विहीरी खोदल्या जातात.  जिल्ह्यात यंदाच्या वर्षी 141 विंधन विहिरींना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी दि. 10 जूनपर्यंत 65 विंधन विहिरींची खोदाई करण्यात आली असून, यातील 50 विहिरी यशस्वी ठरल्या आहेत. 

जिल्ह्यातील 170 गावातील 331 वाड्यांनां टंचाईची झळ बसते. टंचाईग्रस्त भागातून विंधन विहिरींसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. आलेल्या प्रस्तावांमधून 141 विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत 65 विंधन विहिरींची खोदाई करण्यात आली. मंडणगड तालुक्यात 5, दापोलीत 35, खेडमध्ये 3, गुहागरमध्ये 1, चिपळुणात 3, रत्नागिरीत 6, लांजा 5 आणि राजापूर तालुक्यात 7 विंधनहिरी खोदण्यात आल्या आहेत. 

त्यापैकी 50 विंधन विहिरींची खोदाई यशस्वी ठरली.  दापोलीत 9, राजापुरात 3 आणि मंडणगड, रत्नागिरी, लांजा तालुक्यात प्रत्येकी 1 अशा 15 विंधन विहिरींना पाणी लागलेले नाही. 

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी फेब्रुवारी, मार्चपासून वणवण करावी लागते. एप्रिल आणि मे महिन्यात टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. 

टँकरने पाणी पुरवठा करूनही या गावांची तहान भागत नाही. त्यामुळे अशा टंचाईग्रस्त वाड्यांत विंधन विहिरी खोदून टंचाई निवारण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.