होमपेज › Konkan › एकीला वाचविण्यात यश : बोरिवलीतील डिसोझा कुटुंबीयांवर काळाचा घाला

आरे-वारे समुद्रात बुडून पाचजणांचा मृत्यू

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 03 2018 10:22PMरत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील आरे-वारे येथे समुद्रात पोहायला गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला, तर एकीला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना रविवारी (दि.3 जून) सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली.  

केनेथ टिमोथी मास्टर्स (वय 56), मोनिका बेंटो डिसोझा (44), सनोमी बेंटो डिसोझा (22),  रेंचर बेंटो डिसोझा (19), मॅथ्यू बेंटो डिसोझा (18, सर्व राहणार बोरिवली पश्‍चिम) यांचा बुडून मृत्यू झाला, तर लीना केनेथ मास्टर्स (52) हिला वाचविण्यात यश आले. रविवारी सुट्टी असल्याने आरे-वारे येथे समुद्रकिनारी पर्यटकांचा राबता होता. याठिकाणी पर्यटकांना नेहमी स्थानिक  लोक पोहायला उतरण्यास मज्जाव करतात. तरीही काहीजण अतिरेक करून पोहायला उतरतात. 

रविवारी बोरिवली-मुंबईतून 7 जणांचे कुटुंब आरे-वारे येथे समुद्रकिनारी आले होते. यापैकी 70 वर्षीय रिटा डिसोझा या कारमध्येच बसून राहिल्या, तर उर्वरित 6 जणांनी समुद्रकिनारी रपेट मारण्यास सुरुवात केली. दुपारी दोनच्या सुमारास ते समुद्रकिनारी फिरत असताना अचानक त्यांना समुद्रस्नानाचा मोह झाला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास केनेथ टिमोथी मास्टर्स, मोनिका बेंटो डिसोझा, सनोमी बेंटो डिसोझा,  रेंचर बेंटो डिसोझा, मॅथ्यू बेंटो डिसोझा आणि लीना केनेथ मास्टर्स हे पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज घेत ते पोहायलाही लागले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी आरडाओरडा करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक लोकांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यातील 5 जणांचे मृतदेह हाती लागले तर एकीला वाचविण्यास यश आले. यावेळी ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहांचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. 

जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू 

शहरातील साळवी स्टॉप येथील नगरपरिषदेच्या जलतरण तलावात बुडून गुजरातमधील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.3 जून) दुपारी 3 वा. सुमारास घडली. जिगर विनोद पांचाळ (वय 27, रा. गांधीधाम-कच्छ, गुजरात) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त जिगर हा काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. रविवारी त्याचे नातेवाईक आणि तो असे चार ते पाचजण जलतरण तलावात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. जलतरण तलावात पोहण्यासाठी पास घेत असताना त्याला पोहता येते की नाही, असे विचारण्यात आले होते. तेव्हा जिगरने पोहता येत असल्याचे सांगितले होते. पोहण्यासाठी गेल्यावर काही वेळाने जिगर तलावात कोठेही दिसेनासा झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी तलावाच्या तळाला त्याचा शोध घेतला असता, तो पाण्यात बुडालेला दिसून आला.