होमपेज › Konkan › चक्रीवादळामुळे वैभववाडी तालुक्यात 5 लाखांचे नुकसान

चक्रीवादळामुळे वैभववाडी तालुक्यात 5 लाखांचे नुकसान

Published On: May 18 2018 11:16PM | Last Updated: May 18 2018 10:21PM वैभववाडी :  प्रतिनिधी

गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पाऊस व चक्रीवादळाने वैभववाडी शहरासह तालुक्यातील दहा गावातील 50 घरे, दोन गोठे, एक शौचालय यांचे सुमारे 5 लाख 4 हजार 310 रु. नुकसान झाले आहे. नावळे प्राथमिक वि.म.धनगरवाडा  शाळा,  ग्रा.पं.कार्यालय नावळे यांचेही मोठे नुकसान झाले आहे.  या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका करुळ गावाला बसला असून गावातील सुमारे 25 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. याशिवाय सडुरे, नावळे, आचिर्णे, खांबाळे, वाभवे,कोकिसरे, मौंदे, सोनाळी, मांगवली या गावांनाही चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. नुकसानीचे पंचनामे तलाठी व मंडल अधिकार्‍यांकडून करण्यात आले आहेत.  अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. 

तालुक्यात गुरुवारी जोरदार पावसासह चक्रीवादळाने घरावर झाड पडून, तसेच वादळाने पत्रे व कौले उडून गेल्याने अनेक घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. शुक्रवारी महसूल विभागाकडून या नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करण्यात आले.  त्यानुसारे सर्वाधिक नुकसान झालेल्या करुळ गावातील काशिराम भुतल यांच्या घराचे 9600 हजाराचे , बबन भुतल 9100 रू., सुरेश भुतल 6230 रू., नारायण शिंदे 4600रू., विलास भुतल 3100रू., विजय चव्हाण 1900 रू., दत्तात्रय कदम 4950 रू., हनुमंत भुतल 3780रू. , लिलावती  चव्हाण 6300 रू., एकनाथ चव्हाण 1050 रू., सुवर्णा भूतल 2200 रू., अक्षय वळंजू 1750 रू., श्रीकांत शिंगरे 6000 रू., अशोक शिंगरे 5000 रू., सुरेश शिंगरे 5000 रू., हिरावती गुरव 1000 रू., मनोहर गुरव 1650 रू. , पांडुरंग कोलते 1000 रू., तिर्थराम  चव्हाण 400 रू., विजय  चव्हाण 600रू., रामदास राऊत 1800 रू., रघुनाथराव पाटणे 3200 रू., अरुण चव्हाण 8800 रू., प्रदीप मोरे 4850 रू., सडुरे - भगवान  बोडेकर 1000रू., रवींद्र  पवार 1200 रू., दिलीप राणे 1200 रू., काशिनाथ  राणे 1200रू., नावळे- भैरु गुरखे 900 रू., सावित्रीबाई  सावंत 15250 रू., दिगंबर गुरव 2500 रू., मारुती   शेळके 4205 रू., लक्ष्मण  शेळके 24365 रू.. आचिर्णे - सावित्री झोरे 10,000 रू., सुहास दर्डे 50,000 रू.,. खांबाळे -शिवाजी कोतेकर 40000 रू., महेंद्र बोडेकर, 20,000 रू., प्रकाश दळवी 7000रू.  वाभवे - सुहास राणे 90,000 रू., अंकुश परब 12000 रू., जानकीबाई कोकाटे 12000रू., शेखर नारकर 35000रू. कोकिसरे खांबलवाडी येथील यशवंत बाबल्या तानवडे 2500 रू., दाजी विठ्ठल बर्गे 5375 रू. तसेच सुनील पिलाजी काडगे यांच्या पोल्ट्रीचे पत्रे उडून 30 कोंबड्या मृत झाल्याने त्यांचे 14,000 रू.चे नुकसान झाले.  

चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी प्रांताधिकारी नीता सावंत यांनी वैभववाडी येथे भेट दिली. वैभववाडी शहर व नावळे येथे झालेल्या नुकसानीची पहाणी केली. त्यांच्यासमवेत नायब तहसीलदार गमन गावीत, तलाठी रासम आदी उपस्थित होते.  या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला आहे. लघु दाब वाहिनीचे 35 खांब, उच्च दाब वाहिनीचे 4 खांब या वादळाने मोडून पडले.  तर सुमारे 100 गाळ्यातील वीज वाहिन्या तुटून पडल्या आहेत. महावितरण कंपनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे.  वैभववाडी शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.  तर सायंकाळी उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे  अशी माहिती  अभियंता लोथे यांनी दिली.