Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Konkan › राजापूरजवळ भीषण अपघातात ६ जण ठार; ७ जखमी

राजापूरजवळ भीषण अपघातात ६ जण ठार; ७ जखमी

Published On: Sep 11 2018 1:05PM | Last Updated: Sep 11 2018 2:11PMलांजा : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील वाकेड  घाटाजवळ खासगी आराम बस व इको  व्हॅनमध्ये झालेल्या भीषण अपघातात 6 जण ठार तर 7 जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या  सुमारास घडली.

मुंबईतील चाकरमानी राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे गणेशोत्सवासाठी  इको (एमएच-02 एके-9963)  व्हॅनने जात असताना त्याचवेळी राजापूरहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या  खासगी आराम बस (एमएच-04 एफआर-5508) ची वाकेड घाट सुरू होण्याआधीच्या एका अवघड वळणावर हा भीषण धडक होऊन अपघात झाला.  यात  5 जण जागीच ठार व 1 जण कोल्हापूरला उपचारासाठी नेत असताना मृत झाला.

इको व्हॅनमधील सर्व जण मुंबई दहिसर रावळपाडा येथील असून, मूळचे राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील राहणारे आहेत.  या अपघातात प्रियांका उपळकर (वय 21), पंकज घाणेकर (19), भार्गवी माजळकर (6 महिने), मानसी माजळकर(30), राजेश शिवगण (26) हे जागीच ठार झाले. तर, कोल्हापुरात उपचारासाठी नेण्यात येत असताना मंगेश उपळकर (18, रा. कोडये, ता. राजापूर) याचा मृत्यू झाला. 

या  अपघातात लहू उपळकर (18), अंकुश उपळकर (18),  हनुमंत उपळकर (35), सार्थक हनुमंत उपळकर (6)  तर राजापूर दोनिवडे येथील किरण तरळ (18) यांना गंभीर दुखापत झाली असून तिघेजण अत्यवस्थ आहेत. या सर्वांना अधिक उपचाराकरिता कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. या अपघातातील बसचालक नितीन जाधव (34 महाड, रायगड) तर बसचा क्लीनर संदेश कांबळे (21 खावडी, लांजा) या दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.

या अपघाताची भीषणता एवढी होती को इको व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या गाडीतील मृत आणि जखमी काही गाडीतच अडकून होते. त्यांना लांजा आणि कुवे  येथील अनेक युवकांनी बाहेर काढले. या अपघाताचे वृत्त समजताच लांजा पोलिस आणि उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांनी  धाव घेऊन जखमी आणि मृतांना रुग्णवाहिकेने तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, यातील 5 जण जागीच ठार झाले होते. उर्वरित जखमींवर प्राथमिक उपचार करून लगेच कोल्हापूर येथे हलविण्यात आले.

लांजा ग्रामीण रुग्णालयात  शवविच्छेदनगृह नसल्याने सर्व मृतदेह रत्नागिरीला नेण्यात आले. या अपघाताची खबर संदेश कांबळे या बस क्लीनरने दिली. अधिक तपास लांजा पोलिस निरीक्षक गावडे याच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलिस अधिक करीत आहेत.

ऐन गणेशोत्सवात दोन कुटुंबांवर काळाचा घाला

गणेशोत्सव असल्याने कोकणात चाकरमानी आपल्या मूळ घरी येत असतात. उपळकर आणि माजळकर ही दोन कुटुंबेही आपल्या मूळ गावी म्हणजेच राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे निघाले होते.  विघ्नहर्त्या गजाननाचा उत्सव कसा साजरा करायचा, याचे नियोजन करून  ही दोन कुटुंबे मुंबईकडून आपल्या गावाकडे मार्गस्थ झाली. आपल्या गावी जाण्यासाठी सुमारे  32 कि.मी. अंतर बाकी असताना हा अपघात झाला.  अगदी घरापासून नजीकयेऊन झालेल्या अपघातात 6 जणांना विघ्नहर्ताही वाचवू शकला नाही. तर उर्वरित 5 जणांची परिस्थितीही गंभीर आहे.  हा अपघात झाल्याने कोंडये गावावर ऐन उत्सवात शोककळा पसरली आहे.

सर्वांची धावाधाव आणि मदत

या घटनेची खबर मिळताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, लांजा तहसीलदार पाटील यांच्यासह आ. राजन साळवी, सभापती संजय नावथे आणि लांजा शहरातील डॉक्टरांनी घटनास्थळ आणि लांजा ग्रामीण रुग्णालयात स्वतः उपस्थित राहून सर्व जखमींवर उपचारासाठी मदत केली. लांजा शहर आणि परिसरातील अनेक युवकांनीही आपापल्या परीने मदत केली.