Fri, Apr 26, 2019 03:25होमपेज › Konkan › आंबोली परिसरातील ४५ तरुण मनाली पर्वतावर!

आंबोली परिसरातील ४५ तरुण मनाली पर्वतावर!

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 18 2018 8:56PM-गणेश जेठे

प्रशासनातील एखादा अधिकारी मनापासून विकासाभिमुख काम करायचे ठरवतो तेव्हा काहीही होवू शकते. याचा प्रत्यय सध्या आंबोलीतील नियोजित पॅराग्लायडींग प्रकल्पामुळे येत आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी कल्पकतेने आंबोली पॅराग्लायडींगचा प्रस्ताव तयार केला, त्यावेळचे जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनीही मनावर घेतले, पालकमंत्री दीपक केसरकर यांची परवानगी मिळवली आणि खरे आंबोलीच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरेल, असा पॅराग्लायडींगचा प्रकल्प पुढे सरकविण्यास यश मिळविल आहे. 

गेली काही वर्षे कमलाकर रणदिवे हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागात उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहेत. केवळ चौकटीत राहून कमीतकमी काम करून पगार घेवून नोकरी सांभाळणार्‍या अधिकार्‍यांसारखे कामकाज न करता एक राजपत्रित अधिकारी म्हणून विकास प्रक्रिया पुढे नेण्याची आपलीही जबाबदारी आहे हे मान्य करून कमलाकर रणदिवे यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यावेळचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी सिंधुदुर्गनगरी मुख्यालयातील पत्रकारांच्या हिमाचल प्रदेश येथे पर्यटन विषयक अभ्यास दौर्‍यात समन्वय अधिकारी म्हणून रणदिवे यांची नेमणूक केली. तेथील अनेक पर्यटन प्रकल्पाप्रमाणेच पॅराग्लायडींग या प्रकल्पाला त्यांनी आवर्जुन पत्रकारांच्या टीमसह भेट दिली. किंबहुना पॅराग्लायडींगसारख्या धाडसी क्रीडा प्रकारात सहभाग घेण्याचे धाडस त्यांनीच पत्रकारांना दिले. पत्रकारांनीही पॅराग्लायडींगचा थरार अनुभवला. आपल्या जिल्ह्यात आंबोलीच्या दरीत असे पॅराग्लायडींग होवू शकते, अशी चर्चा तिथे झाली. कमलाकर रणदिवे यांनी टूरवरून परतताच आंबोली येथे पॅराग्लायडींग प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला. 

जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि शेखर सिंह यांच्यासमोर कमलाकर रणदिवे यांनी ज्यावेळी प्रस्ताव ठेवला तेव्हा दोन्ही अधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावाला मंजुरी दिली. पालकमंत्री दीपक केसरकर जेव्हा ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कोकण ग्रामीण पर्यटन या नव्या योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेतून जो निधी जिल्हा परिषदेकडे आहे त्यातील 10 लाख रूपये पॅराग्लायडींगच्या ट्रेनिंगसाठी पालकमंत्री केसरकर यांनी मंजूर केले. पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांचा सकारात्मक पाठिंबा मिळताच रणदिवे यांनी या प्रकल्पासाठी कंबर कसली. 

आंबोलीतील बाबल अल्मेडा, आंबोली उपसरपंच विलास गावडे आणि तेथील काही उत्साही पर्यटन व्यवसायिकांची मदत घेवून कमलाकर रणदिवे यांनी पॅराग्लायडींगचे ट्रेनिंग देण्यासाठी 45 तरूण निवडले. त्या प्रत्येक तरूणावर प्रत्येकी 24 हजार रू.खर्च करून मनाली येथे पॅराग्लायडींगच्या ट्रेनिंगसाठी पाठविण्याचा निर्णय झाला. गेल्या 12 जून रोजी आंबोली परिसरातील व सावंतवाडी तालुक्यातील 45 तरूणांचे ट्रेनिंग मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी माऊटनींग या केंद्र सरकारच्या संस्थेकडून सुरू झाले आहे. ती संस्था देशातील एक अग्रगण्य सरकारी संस्था असून या संस्थेचे ट्रेनिंग घेण्यासाठी तीन तीन वर्षे वाट पहावी लागते. परंतु सिंधुदुर्गातील अधिकार्‍यांच्या आग्रहाखातर या 45 तरूणांची स्पेशल बॅच ट्रेनिंगसाठी घेण्यात आली आहे. 11 जुलै  पर्यंत 30 दिवसांचे ट्रेनिंग घेण्यात येणार आहे. 

कमलाकर रणदिवे हे डोळ्याला झापडे बांधून काम करणारे अधिकारी नाहीत, दूरदृष्टीने लोकहिताचे निर्णय राबविण्याचे कौशल्य असलेला एक जबाबदार अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. 45 जणांपैकी 20 ते 25 तरूणांची पुन्हा निवड करण्यात येईल. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्यातील 10 जणांची निवड करण्यात येईल आणि त्यांना पॅराग्लायडींगचे अंतिम व उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्या संस्थेचे सर्टिफिकेट त्या तरूणांना मिळणार आहे.  त्यानंतरच सरकार पॅराग्लायडींग हवेत उडविण्याची परवानगी देवू शकते. एका पॅराग्लायडींग सेटसाठी 4 लाख रूपये खर्च येतो.

कमलाकर रणदिवे यांनी त्याचाही प्रस्ताव तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या 10 तरूणांसाठी शासकीय निधीतून पॅराग्लायडींगची खरेदी केली जाणार आहे. हे पॅराग्लायडींग ग्रामपंचायत किंवा इतर संस्थांना देवून हा प्रकल्प तेथे सुरू केला जाणार आहे. एकदा का हा प्रकल्प सुरू झाला की आपोआपच इतर तरूण या व्यवसायात उतरतील याची खात्री रणदिवे यांना आहे. जेव्हा निसर्गाने समृध्द असलेल्या आणि हजारो पर्यटकांची गर्दी असलेल्या आंबोलीच्या दरीत जेव्हा पॅराग्लायडिंग सुरू होईल तेव्हा रोजगाराच्या मोठ्या संधीही उपलब्ध होतील. 

पत्रकारांच्या दौर्‍याचे फलित

सिंधुदुर्गनगरी मुख्यालयातील पत्रकारांनी आजवर जे पर्यटन अभ्यास दौरे केले त्या प्रत्येक दौर्‍याचे फलित मिळाले आहे. मालवण किल्ल्यावरील होडी चालकांना लाईफजॅकेट वापरण्याचा प्रस्ताव, ई-रिक्षाचा प्रस्ताव आणि आता पॅराग्लायडिंग हे प्रकल्प पत्रकारांच्या अभ्यास दौर्‍याचे फलित समजले जाते.