Thu, Dec 12, 2019 23:46होमपेज › Konkan › बांद्यात ४४ आंदोलक ताब्यात

बांद्यात ४४ आंदोलक ताब्यात

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 10:46PMबांदा : वार्ताहर

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा बंद आंदोलनाला बांदा शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात तुुरळक प्रमाणात दुकाने सुरू होती. शहरातील रिक्षा संघटना, शाळा, महाविद्यालये यांनी बंद होती. मराठा समाज बांधवांनी शेकडोंच्या संख्येने गोळा होत बांदा शहरातून घोषणाबाजी करत रॅली काढली. दरम्यान महामार्ग रोखणार्‍या 44 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याच्या प्रयत्नात करणार्‍या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बांदा दशक्रोशीतील ग्रामीण भागातही ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे तोडून व टायर पेटवून रस्ते वाहतुकीस बंद करण्याच्या घटना घडल्या.  महामार्गावर बुधवारी मध्यरात्रीपासूनच अज्ञातांनी टायर पेटवून महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखला होता .

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात प्रथम चक्‍काजाम आंदोलन बांदा येथे करण्यात आले. मध्यरात्री 12.30 वा. च्या सुमारास शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर सटमटवाडी, कट्टा कॉर्नर चौकात टायर पेटवूून वाहतूक थांबविण्यात आली. पोलिसांनी तातडीने टायर बाजुला करून वाहतूक पूर्ववत केली. गुरुवारी सकाळी 10 वा. च्या सुुमारास  शहरातून सकल मराठा बांधवांनी घोषणाबाजी करत रॅली काढली. बांदा उपसरपंच अक्रम खान यांनी आक्रमक भूमिका घेत शहरातून रॅली काढण्याचा निर्णय घेतला. कट्टा कॉर्नर चौकात विलास सावंत, अन्वर खान, दीपक सावंत, अक्रम खान, नीलेश मोरजकर, जि. प. सदस्य अंकुश जाधव, एस. आर. सावंत यांनी विचार मांडले.

त्यानंतर मराठा बांधव व भगिनींनी शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव केला. यावेळी 44 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली घाटीत रात्री 12 वा.च्या सुमारास चार ठिकाणी झाडे तोडून रस्त्यावर टाकण्यात आली.  राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली-कोठावळेबांध येथे तर डोबवाडी व पागावाडी रस्त्यावर टायर पेटवून टाकण्यात आल्याने वाहतूक बंद होती. डेगवे, वाफोली येथेही रस्त्यावर झाडे तोडून टाकण्यात आली होती.  एसटी बसेस बांदा बसस्थानकात थांबवुन ठेवण्यात आल्या होत्या. गोवा कदंब परिवहन महामंडळाने आपल्या बसेस सिंधुदुर्गात सोडल्या नव्हत्या. तसेच गोव्यातून बांद्यात येणार्‍या खासगी बसेसही सोडण्यात न आल्याने गोवा बसस्थानकावर शुकशुकाट होता.