Sat, Jul 20, 2019 23:50होमपेज › Konkan › जिल्ह्यातील ४३५ शाळा बंद होणार!

जिल्ह्यातील ४३५ शाळा बंद होणार!

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 10:10PM

बुकमार्क करा

ओरोस : प्रतिनिधी

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणावर होणार आहे. सिंधुदुर्गातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 435 शाळा बंद होणार, अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता तीन-चार कि.मी. पायपीट करावी लागणार आहे.

कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. 0 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून नजीकच्या शाळेत चांगली गुणवत्ता मिळावी यादृष्टीने समायोजन होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नजीकच्या खासगी शाळेत या विद्यार्थ्यांचे समायोजन होणार आहे. पालकांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये चांगली जागरुकता आली आहे. त्यामुळे गुणवत्ता असणार्‍या शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे तर कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे समायोजन होणार आहे.  

कमी पटसंख्येतील विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतर केल्यानंतर बंद झालेल्या शाळेतील शिक्षकाची पदस्थापना ही विद्यार्थी समायोजन झालेल्या शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात होणार आहे. त्या शाळांमध्येच त्या शिक्षकाचे वेतन काढले जाणार आहे. परंतु पहिली ते पाचवीपर्यंतची मुले पायपीट कशी करणार हा प्रश्‍न निर्माण होणार आहे. शासनाच्या या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांबरोबर जिल्ह्यातील शिक्षक, उपशिक्षकही अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. सध्या 500 शिक्षकांची पदे रिक्त आहेतच यामध्ये काही समायोजन होतील. परंतु विद्यार्थ्यांना मात्र पायपीट केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

दुर्गम भागामध्ये अनेक शाळा

जिल्ह्यात 435 शाळांमध्ये 0 ते 10 पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, यातील अनेक शाळा या दुर्गम भागात आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना तीन ते पाच कि.मी. पर्यंत दुसरी शाळा उपलब्ध आहे. तेथे समायोजन केले जाणार आहे.