Tue, Jun 02, 2020 22:23होमपेज › Konkan › कोकणातील 43 अपघातस्थळी ‘कॉन्व्हेक्स मिरर’!

कोकणातील 43 अपघातस्थळी ‘कॉन्व्हेक्स मिरर’!

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 11:04PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात धोकादायक ठरणार्‍या अपघात स्थळांवर आता प्रशासनाने  ‘कॉन्व्हेक्स मिरर’चा पर्याय  शोधला आहे. कोकणात पाच जिल्ह्यांत एकूण 196 अपघात स्थळे ही बहुतांश वळणाची आहेत. अशा अपघातस्थळांवर आता वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी ‘कॉन्व्हेक्स मिरर’ बसवला जाणार आहे. यामुळे अपघात टळण्यास मदत होणार आहे.

बहिर्वक्र आरसा बसवण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अशी 43 वळणे निश्‍चित करण्यात आली आहेत. अलीकडेच पावसाळापूर्व नियोजन करताना कोकणातील, विशेष करून पावसाळ्यात होणार्‍या धोकादायक अपघातस्थळांचा आढावा घेण्यात आला होता. यानुसार सर्वाधिक अपघातस्थळे ठाणे जिल्ह्यात असल्याचे आढळले, तर सर्वात कमी अपघातस्थळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर 31 अपघात स्थळे आहेत. त्यामध्ये सर्वाधिक अपघात स्थळेे ही घाटात असलेल्या वळणांवर निश्‍चित करण्यात आली आहेत. यामध्ये बहुतांश स्थळांवर आतापर्यंत वर्षभरात दहापेक्षा जास्त अपघात झाल्याने ही स्थळे धोकादायक म्हणून निश्‍चित करण्यात आली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर पालघर जिल्ह्यात 23, रायगडमध्ये 42  धोकादायक स्थळे यामध्ये निश्‍चित करण्यात आली आहेत.

 वाहनांची प्रतिमा ठळकपणे प्रतिबिंबित 
अपघात स्थळांवर खबरदारीची उपाययोजना करताना आता  यापैकी 43 अपघात स्थळांवर कॉन्व्हेक्स मिररचा पर्याय  सुचविण्यात आला. योजनेनुसार बर्हिर्वक्र आरशावर वळणावर असलेल्या वाहनांची प्रतिमा ठळकपणे प्रतिबिंबित होत असल्याने  हा प्रभावी  उपाय योजण्यात येणार आहे. या यंत्रणेची सुरुवात अलीकडेच पालघर जिल्ह्यात करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात  8, रायगडमध्ये 22 आणि पालघरमध्ये 13 अपघात स्थळांवर कॉन्व्हेक्स मिरर बसविण्यात येणार आहेत.