Mon, Jan 27, 2020 12:29होमपेज › Konkan › ‘नाणार’मध्ये 42 उद्योग आणले का?

‘नाणार’मध्ये 42 उद्योग आणले का?

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 18 2019 12:05AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करीत नाणार परिसरात 42 उद्योग आणणार, अशी भीष्मप्रतिज्ञा करणार्‍या कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी गेल्या वर्षभरात किती उद्योग आणले, असा सवाल नाणार रिफायनरी समर्थकांनी केला आहे. 

गतवर्षी कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी पत्रकार परिषद घेऊन नाणार प्रकल्पामुळे परिसरात प्रदुषण होणार आहे, त्यामुळे पर्यावरणपूरक असे 42 उद्योग आपण परिसरात आणणार आहोत. त्याची यादीही तयार असल्याचे म्हटले होते. मात्र वर्ष होत आले तरीही अद्याप एकही प्रकल्प या परिसरात आलेला दिसत नाही. प्रकल्प आणले असल्यास अशोक वालम यांनी जाहीर करावे, असे आव्हानही प्रकल्प समर्थकांनी दिले आहे.

अशोक वालम यांनी परिसरातील ग्रामीण महिलांना पापड-लोणचे उद्योग उभारून त्यांना स्वावलंबी बनविणार असल्याचे म्हटले होते. गेल्या वर्षभरात किती महिलांना त्यांनी स्वावलंबी केले, हेही जाहीर करावे, असेही आव्हान समर्थकांकडून दिले जात आहे.

अशोक वालम यांनी नाणार परिसर हा सुजलाम्- सुफलाम् करण्यासाठी पर्यावरणपूरक उद्योग आणून येथील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा चंग बांधला होता. मात्र त्यांच्याकडची उद्योगांची यादी गहाळ झाली की काय? असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

सुकथनकर समितीला तांत्रिक बाबींवर विरोध करून माघारी पाठविले होते. प्रकल्प विरोधक हा मोठा विजय समजत होते. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे प्रदुषण होऊन कोकणचा विनाश होईल, असे वातावरण विरोधकांनी निर्माण केले. मात्र समितीला विरोध करण्याऐवजी आपल्या विरोधाचे मुद्दे परखडपणे मांडून समितीकडून आपल्या शंकांचे निरसन करणे आवश्यक होते. रिफायनरी संदर्भात गावा-गावांत जाऊन माहिती देण्यात येत होती. त्यावेळी आपण कुणाचे ऐकणार नाही आणि तुम्ही कोणाचे ऐकू नका, अशापद्धतीने स्थानिकांवर दबाव टाकण्यात आला. मंदिरांच्या आडून त्यांच्यावर सामाजिक बहिष्काराची भीती दाखविण्यात आली. मात्र आता स्थानिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांसह जिल्हाभरातून प्रकल्पाला वाढता पाठिंबा मिळत आहे. येणार्‍या प्रकल्पांना विरोध करून येथील तरूणांना नोकरीधंद्यासाठी बाहेर जाण्याची वेळ आणणार्‍यांना आता कोकणी जनता एकजूट दाखविल, असा विश्‍वास प्रकल्प समर्थकांकडून व्यक्‍त केला जात आहे.

मुंबईतील रिफायनरीपासून 4 किमी अंतरावर राहून आपला उद्योग-व्यवसाय करणार्‍या अशोक वालम यांनी कोकणातील पर्यावरणासंदर्भात मार्गदर्शन करणे थांबवावे. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या 58 हजारांनी घटली आहे, याचाच अर्थ येथील युवक नोकरीधंद्यांनिमित्त मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे येथील भूमीशी त्याची नाळ तुटत चालली आहे. त्यांना जिल्ह्यातच रोजगारासाठी अशा मोठ्या उद्योगांची गरज आहे. मात्र प्रकल्प विरोधक रोजगाराच्या नुसत्या वल्गना करीत आहेत. इतक्या वर्षांमध्ये येथे त्यांना अपेक्षित व्यवसाय, उद्योग का आणता आले नाहीत, याचाही हिशोब विरोधकांनी द्यावा, अशी मागणी समर्थकांकडून होत आहे.

या प्रकल्पाच्या समर्थनाला मोठ्याप्रमाणात जिल्हावासीय पाठिंबा देण्यास पुढे येत आहेत.  स्थानिक विरोध हा मुद्दा आता मागे पडला आहे. प्रकल्प परिसरातील सुमारे साडेसात हजार एकर जमिनीच्या मालकांनी प्रकल्पाला सशर्त संमत्ती दिली आहे. त्यामुळे विरोधकांनी विरोध विसरून प्रकल्प वाचविण्याच्या मोहीमेत सहभागी व्हावे, असे आवाहन समर्थकांनी केले आहे.

15 हजार झाडे लावली तरी कुठे?

कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी या परिसरामध्ये 15 हजार झाडे लावून येथील निसर्गसंपदा समृद्ध करणार असल्याचे सांगितले होते. मात्र वर्षभरात त्यांनी कुठे-कुठे झाडे लावली, जगवली, याचा हिशोबही स्थानिकांना द्यावा, अशी माफक इच्छा समर्थकांनी व्यक्त केली आहे.