Tue, Jul 16, 2019 21:48होमपेज › Konkan › सागरी किनार्‍यांसाठी 42 कोटींचा आराखडा

सागरी किनार्‍यांसाठी 42 कोटींचा आराखडा

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 10:49PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गेल्यावर्षी  पावसाळ्यात  सागरी उधाणामुळे आणि वर्षाच्या अखेरीस आलेल्या ओखी वादळामुळे किनारपट्टीतील अनेक भागात धूपप्रतिबंधक बंधारे वाहून गेले तर काही भागात किनार्‍याची धूप झाल्यामुळे तेथील किनारे धोकादायक झाले आहेत. अशा ठिकाणांची पत्तन विभागाने अलीकडेच पाहणी करून  सुमारे 42 कोटींचा आराखडा किनारा संरक्षण योजनेंतर्गत प्रस्तावित  केला आहे. किनार्‍याच्या संरक्षणासाठी बंधार्‍यांची उभारणी करून हे किनारे सुरक्षित करण्याच्या सूचना  जिल्हा प्रशासनाने केल्या आहेेत.

गेल्या पाऊस  हंगामात समुद्राला मोठे उधाण आले होते.  त्याबाबत अ‍ॅलर्टही प्रशासनाने दिल्या होत्या. सागरी उधाणाने किनारपट्टी भागात धुमाकूळ घातला होता. सुमारे पाच ते आठ मीटर उंचीच्या लाटा किनार्‍यावर येऊन आपटल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात किनारा सुरक्षेसाठी कोट्यवधी रूपये खर्च करून बांधण्यात आलेले धूपप्रतिबंधक बंधारे वाहून गेले. 

काही ठिकाणी किनार्‍यांची मोठी धूप झाली आहे. तसेच डिसेंबर अखेरीस आलेल्या ओखी वादळात मोठे नुकसान झाले. ओखी वादळावेळी झालेल्या पावसात व समुद्राच्या उधाणात काही किनार्‍यांवरील धूपप्रतिबंधक बंधारे वाहून गेले होते. तर अनेक किनार्‍याची धूप झाल्याने हे किनारे पर्यटकांसाठी धोकादायक झाले. 

किनार्‍यांची धूप झाल्यामुळे तेथे बंधारे घालण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अशा ठिकाणांची पत्तन विभागाने पाहणी केली. त्यानुसार जिल्ह्यातील 21 बंधारे आणि 10 किनार्‍यांची धूप थांबवण्यासाठी संरक्षण उपाययोजना सुचवली आहे. जाकीमिर्‍या, भाटीमिर्‍या येथे सुमारे 450 मीटर बंधारा वाहून गेला आहे.

रत्नागिरीतील काळबादेवी किनार्‍यासाठी 800 मीटरसाठी 6 कोटी रूपये, तेथे टेट्रापॉडचा बंधारा विभागाने प्रस्तावित केला आहे. पंधरामाड येथील 12 कोटी, जाकीमिर्‍या येथील 12 कोटी, वेळणेश्‍वर येथील 1200 मीटरच्या बंधार्‍यासाठी 10 कोटींचा या प्रस्तावांचा समावेश आहे. करंजगाव (दापोली) या किनार्‍याची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी दोन कोटींचा निधी अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.

या किनार्‍यांचा समावेश
पत्तन विभागाने सुचवलेल्या 42 कोटींच्या आराखड्यात 42 कोटींच्या प्रस्तावात रत्नागिरी, दापोली, गुहागर येथील किनार्‍यांचा समावेश आहे. यामध्ये  काळबादेवी, मुरूगवाडा, पंधरामाड, मिर्‍या, हेदवी, गुहागर, वेळणेश्‍वर, मालगुंड, आदींचा  समावेश करण्यात आला आहे.