होमपेज › Konkan › ‘बंद’मुळे एसटीचे 40 लाखांचे उत्पन्न बुडाले

‘बंद’मुळे एसटीचे 40 लाखांचे उत्पन्न बुडाले

Published On: Aug 10 2018 11:57PM | Last Updated: Aug 10 2018 11:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्या महाराष्ट्र बंदचा फटका एसटी महामंडळाला बसला. राज्यात काही ठिकाणी आंदोलनाला लागलेले हिंसक वळण पाहता एसटी गाड्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी रत्नागिरी विभागाने गुरुवारी दिवसभर बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाचे 40 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.  

मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून राज्यभर बंदची हाक देण्यात आली होती. खबरदारी म्हणून एसटी महामंडळामार्फत राज्यातील एसटी सेवा बंद ठेवली होती. रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती.

लांजा, राजापूर, चिपळुणातून काही मोजक्याच फेर्‍या सोडण्यात आल्या. दिवसभरात 144 फेर्‍या सुटल्या तर संध्याकाळी वस्तीच्या गाड्यांसह आवश्यक ठिकाणी गाड्या सोडण्यात आल्या. बुधवारी वस्तीला गेलेल्या गाड्या गुरुवारी विभागीय कार्यालयात आणण्यात आल्या. एसटी स्टँडमधील निम्म्या गाड्या विभागीय कार्यालयात आल्या होत्या.
एसटी स्थानकावर वाहतूक बंद असल्याचा फलक लावण्यात आला होता. बंदमुळे एसटीस्टँड परिसर सुनासुना झाला होता. परजिल्ह्यांतून पहाटे रत्नागिरीत आलेल्या ग्रमस्थांना आपल्या गावी जाण्यासाठी गाड्या उपलब्ध न झाल्याने त्यांना एसटी बसस्थानकातच थांबावे लागले. सायंकाळी एसटी बसेस सुरु झाल्यानंतर दिवसभर एसटीच्या प्रतिक्षेत असलेले प्रवासी आपल्या गावी रवाना झाले.