होमपेज › Konkan › चौपदरीकरणासाठी अमर्याद पाणी उपसा; टंचाईची भीती

चौपदरीकरणासाठी अमर्याद पाणी उपसा; टंचाईची भीती

Published On: Apr 23 2018 11:12PM | Last Updated: Apr 23 2018 10:50PMकणकवली : प्रतिनिधी

महामार्ग चौपदरीकरण कामासाठी मार्गा लगतच्या नदी-नाल्यांमधून बेसुमार पाणी उपसा होत आहे. यामुळे नदीपात्रे कोरडी पडून गावागावात टंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. याकडे आपण वेळीच लक्ष देऊन ठेेकेदार कंपनीस पाणी वापराबाबत निर्देश द्यावेत, अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी कणकवली प्रांताधिकार्‍यांना दिला आहे. 

मुंबई-गोवा हायवे लगत असलेल्या ठिकठिकाणच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करून तो रस्ता कामांसाठी वापरत आहेत. चौपदरीकरणासाठी मे अखेरपर्यंत अशाप्रकारे पाण्याचा उपसा झाल्यास व सद्यस्थितीत वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा वाढल्याने गावागावांमध्ये पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे. 

चौपदरीकरण  ठेकेदार कंपनीच्या या अनिर्बंध पाणी उपासामुळे  नदीपात्रातील पाण्याचा साठा कमी होत आहे. अनेक गावांतील नळयोजनेचे स्त्रोत नदीपात्रात असल्याने नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नदी लगतच्या शेतीला पाणी पुरवठा मिळणार नाही, गुरांच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे व नदीपात्रालगत असणार्‍या विहिरींना पाण्याचा पाझर न झाल्याने विहिरी आठण्याची शक्यता आहे. या सर्व समस्यांना ग्रामस्थ व जनतेला तोंड द्यावे लागेल. यामुळे नदीतून होणारी पाण्याची उचल थांबविण्यात यावी.

रस्त्याचे काम थांबविण्याचा पक्षाचा उद्देश नसून मुंबई-गोवा हायवेलगत असलेल्या जवळपासच्या छोटी-मोठी धरणे बांधलेली असून या धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उचल होत नाही. त्या धरणातून पाणी उपसा करून रस्त्याच्या कामांना वापरण्याचा उपाय केल्यास कामही थांबणार नाही. जनतेला पाणी टंचाईचा परिणाम होवून प्रशासनावर पाणी पुरवठा करण्याचा ताण पडणार नाही. याकरिता तातडीने नदीतून होणारा पाण्याचा उचल बंद करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला जनतेच्या पाणी प्रश्‍नांसाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.