Sun, Apr 21, 2019 05:46होमपेज › Konkan › दाभोळे येथे ट्रक उलटल्याने ४ तास वाहतूक विस्कळीत

दाभोळे येथे ट्रक उलटल्याने ४ तास वाहतूक विस्कळीत

Published On: May 28 2018 1:41AM | Last Updated: May 27 2018 10:03PMसाखरपा : वार्ताहर 

दाभोळे येथे रविवारी सकाळी दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक तब्बल 4 तास विस्कळीत झाली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.

जागृती ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (एमएच -10  झेड-1419) रविवारी सकाळी किराणा मालाची पोती भरून कोल्हापूरहून रत्नागिरी येथे येत होता. चालक सुनील शामराव साठे (39, रा. पैजारवाडी, ता. पन्हाळा) हा ट्रक घेऊन दाभोळे बाजारपेठेतून पुढे आला. यावेळी समोरून पीव्हीसी पाईप भरलेला ट्रक (एमएच-11 एएल-3023) कोल्हापूरच्या दिशेने येत होता. ट्रकचालक चंद्रकांत दगडू घाडगे (30, रा. कित्‍तूर) हा उतारात असल्यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि साठे याच्या ट्रकला धडक दिली. यावेळी ट्रकचालक साठे यांनी तातडीने ब्रेक लावल्याने सामानाने भरलेला अवजड ट्रक रस्त्यातच उलटला. 

सामानाने भरलेला ट्रक  रस्त्यात मधोमध उलटल्यामुळे महामार्गावर  वाहतूक कोंडी झाली. साखरपा आणि रत्नागिरी या दोन्ही बाजूंनी सुमारे दोन किलोमीटरची वाहनांची रांग लागली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन लहान वाहने कनकाडीमार्गे वळविली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात कमी झाली. पोलिसांनी दुपारी साडे अकराच्या सुमारास क्रेन आणून उलटलेला ट्रक बाजूला काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.