Thu, Jun 27, 2019 11:40होमपेज › Konkan › लांजा-कुवे शहर विकास आघाडीचे ४ नगरसेवक अपात्र

लांजा-कुवे शहर विकास आघाडीचे ४ नगरसेवक अपात्र

Published On: Aug 16 2018 10:51PM | Last Updated: Aug 16 2018 10:26PMलांजा : प्रतिनिधी 

लांजा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडणुकीत पक्षादेश (व्हीप) डावलून शिवसेनेला मतदान केलेल्या लांजा-कुवे शहर विकास आघाडीच्या चार नगरसेवकांना जिल्हाधिकार्‍यांनी गुरुवारी अपात्र ठरवले.

लांजा नगरपंचायतीची नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडणूक 10 ऑगस्ट 2017 रोजी झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे सुनील कुरूप नगराध्यक्ष तर शहर आघाडीतून फुटून गेलेले मनोहर कवचे उपनगराध्यक्ष निवडून आले होते. नगरपंचायतीत लांजा-कुवे शहर विकास आघाडीचे 11 तर शिवसेनेचे 6 नगरसेवक असे संख्याबळ आहे. परंतु, प्रत्यक्ष नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेला 10 तर शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना 6  मते पडली होती. मानसी डाफळे या नगरसेविकेने  नगराध्यक्ष निवडणुकीत स्वतः अर्ज दाखल केल्याने त्यांनी नगराध्यक्ष निवडणुकीत  स्वतःला आणि  उपनगराध्यक्ष निवडणुकीत तटस्थ  राहण्याची भूमिका घेतली होती.

या प्रकरणी गटनेत्या संपदा वाघधरे आणि दिलीप मुजावर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबतची तक्रार दाखल करून लांजा शहर विकास आघाडीतून फुटलेले परवेश घारे, मनोहर कवचे, सुगंधा कुंभार आणि मुरलीधर निवळे यांना पक्षांतर्गत कायद्यानुसार अपात्र ठरवावे, अशी मागणी केली होती. या तक्रार अर्जावर गेली सात महिने सुनावणी सुरु  होती. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी जिल्हाधिकार्‍यांनी निकाल दिला. 

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी व्हीप डावलून शिवसेनेला मतदान केलेल्या चार नगरसेवकांच्या विरोधात महाराष्ट्र स्थानिक  प्राधिकरण  सदस्य अपात्र अधिनियम 1986 चे कलम 3(1)( ब) नुसार आणि नियम 1987 मधील नियम 8 प्रमाणे  अपात्रतेचा निकाल दिला आहे. त्याचप्रमाणे परवेश घारे, सुगंधा कुंभार, मुरलीधर निवळे, मनोहर कवचे  या चारही नगरसेवकांचे पद रिक्‍त झाल्याचेदेखील जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केले आहे. 

विविध पक्ष कार्यकर्त्यांना आनंद 

लांजा शहर विकास आघाडीतून फुटून शिवसेनेला मदत करणार्‍या चार नगरसेवकांना अपात्र ठरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि मित्र पक्षाचा कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्‍त केला जात आहे.