Fri, Apr 26, 2019 00:09होमपेज › Konkan › कृषी विभागात ३९९ पदे रिक्‍त

कृषी विभागात ३९९ पदे रिक्‍त

Published On: Jun 29 2018 12:06AM | Last Updated: Jun 28 2018 10:49PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना विविध योजनांची माहिती देण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून होते. मात्र, जिल्ह्यातील कृषी विभागात मंजूर 784 पदांपैकी सुमारे 399 पदे रिक्‍त आहेत. यामुळे शासनाच्या अनेक योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. 

कृषी सहायक आणि मंडल अधिकारीस्तरावर तयार केलेला अहवाल तालुका कृषी अधिकार्‍यांमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे येतो. पीक नोंद करत असताना कृषी सहायकांनी थेट शेतात जाऊन पीक पाहणी करूनच नोंद घ्यावी, असा नियम आहे. पण ही पदे रिक्‍त असल्याने अहवाल तयार करण्यात विलंब होत आहे.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेती, फळबाग लावगड केली जाते. मासेमारी वगळता उर्वरित वर्गाचे शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. शेतकर्‍यांचा थेट संबंध कृषी विभागाशी येतो. राज्य, केंद्र सरकारच्या विविध योजना शेतकर्‍यापर्यंत पोहोचविण्याबरोबरच शेतीचे सर्वेक्षण, शेतकर्‍यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांची आवश्यकता असते. 

रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तंत्रअधिकारी चार पदे मंजूर आहेत. त्यांपैकी 3 पदे रिक्‍त असून, केवळ 1 पद भरण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी 9 पदे मंजुर असून, 3 रिक्‍त असून सहा पदे भरण्यात आली आहेत. तंत्र अधिकारी उपविभागीय तीन पदे मंजूर असून, तीनही रिक्‍त आहेत.सहाय्यक प्रशासन अधिकारी एक पदे आहे तेही रिक्‍त आहे. कृषी पर्यवेक्षकांची 80 पदे मंजूर असून, त्यापैकी 65 पदे भरण्यात आली आहेत. तर कृषी सहाय्यकांची 363 पदे मंजूर असून, 112 पदे रिक्‍त आहेत. गेली अनेक वर्षे रिक्‍त पदे भरण्याची मागणी होत असून, शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम मात्र विकासावर होत आहे.

कामकाजावर परिणाम...

शेतकर्‍यांच्या संख्येनुसार रत्नागिरी जिल्ह्याला अधिकारी, कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. एकूण 784 पैकी 399 पदे रिक्‍त असल्याने त्याचा परिणाम कामावर होत असून, त्याचा फटका शेतकर्‍यांना बसतो आहे. एका बाजूने शेतीच्या प्रगतीसाठी शासन निधी पुरवत असताना दुसर्‍या बाजूला मात्र कर्मचारी भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे.