Wed, Aug 21, 2019 06:32



होमपेज › Konkan › समुद्रात उसळणार अडीच मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा

पावसाळ्यात ३८ दिवस धोकादायक

Published On: Jun 12 2019 1:19AM | Last Updated: Jun 12 2019 1:19AM




रत्नागिरी : प्रतिनिधी

यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात 38 दिवस धोक्याचे आहेत. या दिवशी समुद्राला मोठे उधाण येणार असून, अडीच मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र आणि खाडी किनार्‍यावरील गावांना उधाणाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यातील उधाणाचे दिवस हे किनारपट्टीवरील गावांसाठी परीक्षा घेणारे ठरतात. मुसळधार पाऊस पडल्यास पूरस्थिती निर्माण होते. जिल्ह्यात अनेकदा असे प्रसंग निर्माण झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणादेखील समुद्राला येणार्‍या भरती ओहोटीचा अभ्यास करून उधाणाने संभावित हानी टाळण्यासाठी प्रयत्न करते.  

यंदाच्या वर्षी दि. 2, 3, 31 ऑगस्ट आणि दि. 1 सप्टेंबर रोजी पावणेतीन मीटरपेक्षा अधिक उंचीची लाट येणार आहे.  या उधाणांच्या दिवशी मुसळधार पाऊस पडल्यास बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 

या उधाणाचा समुद्रकिनारी व खाडीकिनारी असलेल्या गावांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे उधाणाच्या कालावधीत या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजनांची तयारी आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरू केली आहे.  

पावसाळ्यात समुद्राला मोठे उधाण येत असल्यामुळे दि. 1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारी पूर्णतः बंद असते. या कालावधीत बिगर यांत्रिक नौकेद्वारे किनारपट्टी भागात मासेमारी केली जाते. 

हायटाईडच्या कालावधीत कोणीही समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.  दरम्यान, केरळात पावसाने हजेरी लावली असून, लवकरच कोकणातही त्याचे आगमन होणार आहे.