Thu, Jul 18, 2019 12:17होमपेज › Konkan › ११ वर्षांत ३८ बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश

११ वर्षांत ३८ बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 10:55PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या 11 वर्षांत परवानगी नसलेली औषधे पुरवणार्‍या 38 डॉक्टरांचा पर्दाफाश करण्यात आला. या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. परंतु, कोर्टात गुन्हा शाबित होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.  

वैद्यकीय उपचारासाठी परवानगी मिळावी म्हणून खोटी कागदपत्रे सादर करून रुग्णांच्या जिवाशी खेळणार्‍या बोगस डॉक्टरर्सची शोधमोहीम हाती घेत या डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सन 2007 पासून कारवाई सुरू केली. कारवाई करण्यात आलेल्या 38 बोगस डॉक्टरांपैकी मंडणगड तालुक्यातील चार बोगस डॉक्टरांचा समावेश आहे. दापोलीतील 1, खेडमधील 3, गुहागर 3, चिपळूण 3, संगमेश्‍वर 2, रत्नागिरी 5, लांजा 8 आणि राजापूर तालुक्यांत सर्वाधिक 9 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना रुग्णांना औषध पुरवठा केल्याप्रकरणी या कारवाया करण्यात आल्या आहेत. 

बोगस डॉक्टराविरोधात कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली असली तरी न्यायालयात गुन्हा शाबित करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. 2007 पासून 38 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांपैकी 23 प्रकरणे अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहेत. सातजणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली आहे. दोघेजण मयत झाल्याने केस चालू शकली नाही तर 38 पैकी केवळ एका बोगस डॉक्टरवरील गुन्हा शाबित झाला आहे. 

सतर्क नागरिकांचीही शासनाला मदत

बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी नागरिकांची मदत घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला होता.  नागरिकांनीदेखील बोगस डॉक्टरां विरोधात केलेल्या तक्रारीनंतर आरोग्य विभाग, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अन्न व औषध प्रशासन अधिकारी या तीन विभागांकडून संयुक्‍तरित्या जिल्ह्यातून तक्रार प्राप्त झालेल्या बोगस डॉक्टरांविरोधात एकत्रित कारवाई करण्यात आली.