Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Konkan › खेडमध्ये ३३ विद्यार्थ्यांना विषबाधा

खेडमध्ये ३३ विद्यार्थ्यांना विषबाधा

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 10:39PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कळंबणी बुद्रुक क्र. 2 मध्ये गुरुवारी दुपारी शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. एकूण 33 पैकी 23 विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना घरी पाठवण्यात आले, तर 10 विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक शाळा क्र.2 मध्ये नियमित शालेय पोषण आहार दिला जातो. गुरूवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला.  विद्यार्थ्यांनी पोषण आहार खाल्यानंतर काही वेळाने एकामागे एक विद्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या. काही विद्यार्थ्यांच्या पोटात दुखू लागले. पोषण आहार शिजवणार्‍यांनी आणि काही ग्रामस्थांनी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात या प्रकाराची माहिती दिली. यानंतर दोन रूग्णवाहिका शाळेत पाठवण्यात आल्या.

प्रशालेतील 33 विद्यार्थ्यांना रूग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले. तेथील डॉ.गरूड, डॉ.पालकर व त्यांच्या सहकार्‍यांनी तत्काळ विद्यार्थ्यांची तपासणी केली. 33 पैकी 23 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना प्रतिबंधात्मक औषधोपचार करून रूग्णवाहिकेने घरी सोडण्यात आले. मात्र, 10 विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले.  पारस धोंडू चिंचघरकर (11), वैष्णवी संतोष हंबीर (10), अंकुश मनोहर जोशी (9), सानिका प्रकाश थोरे (11), देविका प्रवीण देवघरकर (9), समर्थ सतीश सुतार (8), स्नेहा सुनील बाईत ( 9), सामिध्य मंगेश सुतार ( 9), रोहन एकनाथ देवघरकर (12), साई सतीश सुतार (13, सर्व रा. कळंबणी) अशी अत्यवस्थ विद्यार्थ्यांची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या शाळेत विषबाधा झाली त्या शाळेतील पोषण आहाराचे नमुने तसेच पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेतले.