Mon, Jun 24, 2019 16:37होमपेज › Konkan › पक्षीमित्र संमेलनावर दापोलीची मोहोर!

पक्षीमित्र संमेलनावर दापोलीची मोहोर!

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 10:27PM

बुकमार्क करा

दापोली : प्रतिनिधी

ठाणे येथील  गडकरी  रंगायतन येथे पार नुकत्याच पडलेल्या 31व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या  पक्ष्यांच्या छायाचित्र प्रदर्शनात येथील येथील अथर्व निजसुरे या सातवीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांने रेखाटलेली चित्रे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील हौशी छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त केलेल्या विविध पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन गडकरी रंगायतनच्या तालीम हॉलमध्ये भरवण्यात आले   होते.

या प्रदर्शनात चित्रकलेची दैवी देणगी लाभलेल्या अथर्वला अतिशय लहान वयात आईने चित्रकलेसाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे समज आल्यापासूनच अथर्व हा विविध कार, गाड्या रेखाटू लागला. अथर्वची ही कला त्याच्या पालकांनी हेरून ती अधिक बहरण्यासाठी त्याला सातत्याने प्रोत्साहन दिले. अथर्व फुलपाखरे, पक्ष्यांची चित्रे हुबेहुब रेखाटून अतिशय सुंदर रंगवू लागला.

अथर्वच्या या दैवी कलेबद्दल आयोजकांना माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला प्रदर्शनात पक्ष्यांची स्केचेस ठेवण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्याला वेगळा पॅनेलदेखील प्रदर्शनाच्या दर्शनी भागात उपलब्ध करून दिला आणि अथर्वची कॉमन किंगफिशर, ग्रेट पीइड हॉर्नबिल, ब्राहमी काईट, इंडियन पित्ता, ग्रेटर प्लेमिंगो, लेसर गोल्डन बॅक वूडपेकर या सहा पक्ष्यांची स्केचेस या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. 

पक्ष्यांची हुबेहुब रेखाटलेली ही स्केचेस केवळ इयत्ता सातवीत शिकणार्‍या अर्थवने काढली आहेत, ही माहिती प्रदर्शन पाहताना रसिक, पक्षीमित्रांना मिळाली.  त्यावेळी त्यांनी या स्केचेसना विशेष दाद देत अथर्वचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

अथर्वने चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसून त्याला उपजतच चित्रकलेची आवड आहे.  त्यातून त्याने ही स्केचेस काढली आहेत. आजपर्यंत त्याने विविध चित्रे रेखाटली. मात्र, त्याची स्केचेस प्रथमच जाहीर प्रदर्शनात 31 व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या निमित्ताने मांडण्यात आल्याने खूप आनंद झाला असल्याची भावना अथर्व याची आई जिल्पा निजसुरे यांनी व्यक्त केली आहे.