Tue, Jul 16, 2019 11:38होमपेज › Konkan › जिल्हा बँकेच्या ३० लाखांवर हॅकर्सकडून डल्ल्याचा प्रयत्न

जिल्हा बँकेच्या ३० लाखांवर हॅकर्सकडून डल्ल्याचा प्रयत्न

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 10:46PMसिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हॅकर्सनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केलेले 30 लाख रुपये वाचवण्यात या बँकेला यश मिळाले आहे. याबाबतची तक्रार जिल्हा बँकेने जिल्ह्याच्या सायबर सेल पोलिस दलाकडे तसेच सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ग्राहकांना फसवून त्यांच्याकडून त्यांचे एटीएम नंबर तसेच खाते नंबर घेऊन त्यांच्या खात्यातील पैसे काढून फसविण्याचे प्रकार नित्य कानांवर येत असतात. मात्र, हॅकर्सद्वारे प्रत्यक्ष बँकेलाच फसवण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पणजी-गोवा येथील आयडीबीआय बँकेच्या खात्यावरून 30 लाख रुपये एवढी रक्‍कम लंपास करण्याचा प्रयत्न हॅकर्सद्वारे झाला होता. मात्र,  जिल्हा बँकेच्या अकाऊंट व संगणक विभागाने सतर्कता दाखविल्याने या बँकेची तब्बल तीस लाख रुपयांची होणारी फसगत थांबवता आली आहे.याबाबत सविस्तर हकीकत अशी की, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चालू खाते आयडीबीआय बँक शाखा पणजी-गोवा येथे आहे. या खात्यामधून जिल्हा बँक आपल्या ग्राहकांना फंड ट्रान्सफर करत असते. असे फंड ट्रान्सफर करत असताना जिल्हा बँकेच्या अधिकृत मेलवरून आयडीबीआय बँकेत सूचना दिल्या जातात. या सूचना प्राप्त झाल्यावर सूचना पत्रातील तपशीलाप्रमाणे आयडीबीआय बँक फंड ट्रान्सफरची कार्यवाही करीत असते .

अलीकडेच जिल्हा बँकेने आयडीबीआय या बँकेत आपल्या मेलद्वारे फंड ट्रान्सफरबाबत कोणतीही सूचना दिलेली नसतानाही आयडीबीआय बँकेच्या गोव्यातील शाखेने दिल्ली येथील यस (धएड) बँकेच्या शाखेला त्या शाखेतील एका ग्राहकाच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे 30 लाख रुपये रक्‍कम वर्ग केल्याचे जिल्हा बँकेच्या अकाऊंट विभागातील अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले. या अधिकार्‍यांनी ही बाब तत्काळ आयडीबीआय बँकेच्या निदर्शनास आणली. जिल्हा बँकेच्या अकाऊंट व संगणक विभागाने सतर्कता दाखवून केलेल्या कार्यवाहीमुळे आरटीजीएस असूनही 30 लाख रुपये एवढी रक्‍कम यस बँकेच्या पातळीवर राखून ठेवण्यात बँकेला यश मिळाले आहे. याबाबतची सविस्तर माहिती घेता जिल्हा बँकेचे ईमेल खाते हॅक करून बनावट ई-मेल द्वारे आयडीबीआय बँकेची दिशाभूल करून जिल्हा बँकेस फसविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.याबाबतची रितसर तक्रार जिल्हा बँकेच्या वतीने सायबर सेल पोलिस दलाकडे तसेच सिंधुदुर्गनगरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.