Mon, Mar 18, 2019 19:19होमपेज › Konkan › स्पिरीटसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त; बांदा पोलिसांची धडक कारवाई

स्पिरीटसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त; बांदा पोलिसांची धडक कारवाई

Published On: Jan 09 2018 8:37PM | Last Updated: Jan 09 2018 8:37PM

बुकमार्क करा
बांदा : वार्ताहर

बिलटीवर असलेले स्पिरिट आणि टँकरच्या टाकीत असलेले स्पिरिट तपासण्यासाठी थांबविण्यात आलेल्या टँकरमध्ये भलतेच स्पिरिट बांदा पोलिसांना आढळून आल्याने २२ लाख ५० हजार रुपयांच्या स्पिरीटसह साडेसात लाखांचा टँकर असा एकूण ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बांदा पोलिसांच्या इन्सुली लाठीवर सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी टँकरचालक व क्लिनर या दोघांना बांदा पोलिसांनी अटक केली.

याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या टँकरला तपासणीसाठी थांबविण्यात आले. यावेळी टँकरचालकाकडे बिलटी मागितली असता त्याने बिनदिक्कत बिलटी काढून देत आतमध्ये नेचर स्पिरिट असल्याचे सांगितले. मात्र याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी टँकरच्या टाकीची तपासणी केली असता त्यामध्ये वेगळेच स्पिरिट असल्याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांना माहिती दिली.

दरम्यान पोलीस निरीक्षक कळेकर यांनी त्याठिकाणी जात या स्पिरिटची पाहणी केली असता हे स्पिरिट व बिलटीवरील स्पिरिट यात फरक आढळून आला. हा टँकर तेलंगणा(आंध्रप्रदेश) येथून आल्याचे टँकरचालकाने सांगितले. मात्र भाषेचा अडसर निर्माण झाल्याने अधिक माहिती पोलिसांना मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. हा टँकर कर्नाटक येथे आपल्या ताब्यात दिला व तो गोवा येथे नेण्यास सांगितल्याचे चालकाने सांगत टँकरच्या टाकीत नेमके काय होते याची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले. 

गेले काही दिवस या मार्गावरून अवैध स्पिरिटची वाहतूक बंद होती.मात्र बांदा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध स्पिरिट वाहतूक करणार्यांना जबर दणका बसला आहे. ही कारवाई जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हेमंत पेडणेकर, पोलीस हवालदार शहाजी बुरुड, पो.कॉ.विठोबा सावंत, पोलीस हवालदार संजय कदम व प्रसाद कदम  यांनी केली. 

मुंबई गोवा महामार्गावरून अवैध स्पिरिटची वाहतूक होत असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. मात्र आजच्या कारवाईत बांदा पोलीस कर्मचारी हेमंत पेडणेकर,शहाजी बुरुड व विठोबा सावंत यांच्या चाणाक्ष नजरेला दाद द्यावी लागेल. लाठीच्या अगोदर एक्साईजचे कार्यालय आहे. याठिकाणीही हा टँकर थांबविण्यात आला होता. तपासणी करून तो सोडण्यात आला. मात्र बांदा पोलिसांच्या हुशारीने हा टँकर पकडण्यात आला.