होमपेज › Konkan › २७ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत! 

२७ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत! 

Published On: Jun 29 2018 12:06AM | Last Updated: Jun 28 2018 10:20PMकुडाळ : प्रमोद म्हाडगुत 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाली. मात्र, गणवेश किंवा गणवेशासाठीचे अनुदान हाती पडलेच नाही. जिल्हा परिषदेकडे शासनाकडून गणवेशाचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, वरिष्ठ स्तरावरून अनुदान वितरित करण्याचे निश्‍चित आदेश प्राप्त न झाल्याने गणवेश निधीचे वितरण खोळंबले आहे. परिणामी, जिल्ह्यातील जवळपास 27 हजार विद्यार्थी गणवेश अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके व गणवेश देण्याचे शासनाचे धोरण आहे. दरवर्षी काही ना काही तांत्रिक कारणांमुळे अशा अंमलबजावणीत अडथळा येतो. चालू शैक्षणिक वर्षातही  अशी परिस्थिती कायम आहे. शासनाने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना गणवेश लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती देण्याचे आदेश दिले. त्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करत जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व शाळांना तसे लेखी व तोंडी आदेश देत विद्यार्थी संख्या मागविली.

यामध्ये एस.टी, एन. टी, अनु.जाती, अनु.जमाती, सर्व मुली, दारिद्य्ररेषेखालील मुले यांचा समावेश होतो. मुलांच्या संख्येची परिपूर्ण माहिती शासनाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे दिली. जि. प. शिक्षण विभागाने ती माहिती शासनाला कळविली. शासनाकडून शाळा सुरू होण्यापूर्वी पुस्तके आली पण गणवेशाकरिता अनुदान आले नाही. शाळा सुरू झाल्यानंतर गणवेशाचे अनुदान (निधी) जि. प. कडे शासनाकडून आले, पण अनुदान वितरीत करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले नाहीत. परिणामी सिंधुदुर्गातील जवळपास 27 हजार विद्यार्थ्याना अद्यापही गणवेशाकरिता निधी उपलब्ध झाला नाही. उपलब्ध माहितीनुसार गणवेशाच्या निधीचे वितरण कसे करायचे? हा प्रश्‍नही जिल्हा शिक्षण विभागासमोर असून त्याबाबतचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून येणार आहेत. त्यानंतरच  गणवेश वाटप अनुदानाचे वितरण मार्गी लागेल, असे बोलले जात आहे.

आदेश मिळताच अनुदानाचे वितरण ः शिक्षणाधिकारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांकरिता गणवेशाचे अनुदान प्राप्त झाले आहे. मात्र, गणवेश अनुदान वाटपाबाबत वरिष्ठ स्तरावरून अद्याप स्पष्टपणे निर्देश प्राप्त झाले नाहीत. याबाबत आम्ही वरिष्ठांच्या संपर्कात असून निर्देश प्राप्त होताच गणवेशाचे अनुदान वितरित केले जाईल. आता प्रतिगणवेशाकरिता 100 रु. वाढ केल्याने प्रतिगणवेश 300 रुपये मिळणार आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशाकरिता 600 रुपये मिळणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितले.