Tue, Jul 23, 2019 02:50होमपेज › Konkan › चाकरमान्यांच्या तपासणीसाठी २५ पथके

चाकरमान्यांच्या तपासणीसाठी २५ पथके

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 10:12PMरत्नागिरी : प्रतिनिधी

गणेशोत्सवात जिल्ह्यात येणार्‍या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी  25 पथकांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. ही पथके दि. 10 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत 24 तास कार्यरत राहणार आहेत.

दि. 13 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. त्यासाठी मुंबई, पुणेसह राज्याच्या विविध भागांतून चाकरमानी कोकणातील आपल्या गावी दाखल होणार आहेत. त्यांची जिल्ह्यात येण्यापूर्वी साथीच्या आजाराच्या द‍ृष्टीने तपासणी होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य विभागाकडून आरोग्य पथकांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. या आरोग्य पथकांमार्फत प्रवाशांची रक्‍त तपासणी करण्यात येणार आहे. संशयित रुग्ण वाटल्यास त्याच्यावर उपचारही केले जाणार आहेत. यासाठी रुग्णांचे फोन नंबर, पत्तेही घेतले जाणार आहेत. वैद्यकीय पथकांबाबत पोस्टर्स, बॅनर्सद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी तसेच सर्व रेल्वे स्थानक, महत्त्वाची बसस्थानके आणि महामार्गावर पोलिस पथके असणार्‍या ठिकाणी ही पथके कार्यरत राहणार आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यात एसटी स्टँड, दापोली तालुक्यात एसटी स्टँड, खेड तालुक्यात कशेडी घाट, भरणेनाका आणि रेल्वे स्टेशन, गुहागर तालुक्यात शृगांरतळी एसटी स्टँड, चिपळूण तालुक्यात परशुराम घाट, बहादूरशेख नाका वहाळ फाटा, एसटी स्टँड आणि वालोपे रेल्वेस्टेशन, संगमेश्‍वर तालुक्यात आरवली, संगमेश्‍वर, देवरुख फाटा बावनदी, साखरपा एसटी स्टँड आणि संगमेश्‍वर रेल्वे स्टेशन, रत्नागिरी तालुक्यात हातखंबा तिठा, पाली आणि रेल्वे स्टेशन, लांजा तालुक्यात वेरळ आणि लांजा हायस्कूल समोर, एस.टी. स्टँड, राजापूर तालुक्यात ओणी, राजापूर जकातनाका आणि राजापूर रोड रेल्वे स्टेशन येथे ही पथके नियुक्‍त करण्यात येणार  आहेत.