Mon, Apr 22, 2019 23:42होमपेज › Konkan › चौपदरीकरणामुळे २५ नळपाणी योजना पडणार बंद!

चौपदरीकरणामुळे २५ नळपाणी योजना पडणार बंद!

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 09 2017 8:13PM

बुकमार्क करा

ओरोस : प्रतिनिधी

महामार्ग चौपदरीकरणात जिल्ह्यातील 25 गावांच्या पाणी योजना बाधित होत असल्याने त्या बंद पडणार आहेत. या गावांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था प्रथम करूनच महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु करावे, अशी मागणी सदस्यांनी जलव्यवस्थापन समिती सभेत केली. यावर सोमवार 11 रोजी आयोजित विशेष  बैठकीत तोडगा काढण्याचे आश्‍वासन जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी दिले.

जि. प. जलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हाध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदस्य श्‍वेता कोरगांवकर, प्रमोद कामत, सावी लोके, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, विकास कुडाळकर, अमरसेन सावंत, मायकल डिसोजा, हरी खोबरेकर, संजय आंग्रे आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.  महामार्गाच्या खारेपाटण ते झाराप टप्प्याच्या चौपदरीकरणासाठी संपादीत जमिनीत 25 गावांच्या पाणी योजना  आहेत. यामुळे योजना बंद पडणार आहेत. यासाठी ज्या प्रमाणे संपादीत जमिनीतील  टेलीफोन, वीज पोल हटविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येते, त्याच धर्तीवर पाणी योजना पर्यायी ठिकाणी उभारणीसाठी  आर्थि तरदूत करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

त्या शिवाय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु करु नये, अशी सूचना सदस्यांनी केली. त्यावर अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंता व राष्ट्रीय महामार्गचे अभियंता यांची संयुक्‍त  बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.

लघु उपसा योजनेंतर्गत  कार्यान्वीत 1 हजार 606 सिंचन योजनें पैकी130 योजना वापर नसल्याने निर्लेखीत करण्यात आल्या आहेत. 540 योजनांची कार्यक्षमता संपल्याने बंदावस्थेत आहेत. तर केवळ 936 योजना सुरू असल्याची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विविध योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुमारे 10 कोटींचा निधी मंजूर झाला असून 168 वाड्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

भंगसाळ नदीवर किमान मातीचा बंधारा घाला

कुडाळ-भंगसाळ नदीवर नवीन बंधारा बांधण्यासाठी पूर्वीचा बंधारा तोडण्यात आला आहे. बंधारा तोडल्याने पावसाळ्यानंतर साचणार्‍या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हे पाणी न साचल्याने लगतच्या सुमारे 15 गावातील पाण्याच्या पातळीत घट होणार आहे. मे महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा बंधारा बांधून होणार नसेल तर निदान मातीचा बंधारा घालून पाणी अडविणे आवश्यक आहे. राज्य पाटबंधारे विभागाने यासाठी हालचाली कराव्यात अशी मागणी करण्यात आली. याबाबत संबंधितांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा असे आदेश सौ. सावंत यांनी दिले.