Wed, Jul 17, 2019 18:06होमपेज › Konkan › भिंतीआड राहणार्‍या त्यांच्यासाठी ‘झाले मोकळे आकाश’

भिंतीआड राहणार्‍या त्यांच्यासाठी ‘झाले मोकळे आकाश’

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 9:30PMरत्नागिरी ः प्रतिनिधी 

नेहमी चार भिंतीमध्येच वावर असणार्‍यांना बाहेरचे दरवाजे मोकळे करून दिले की, त्यांच्या आनंद गगनात मावेनासा होतो. इतरांप्रमाणेच आपल्यालाही कोणीतरी भेटायला यावे या अपेक्षेने नेहमी बंद दाराकडे पाहणार्‍या निराधार रुग्णांना प्रादेशिक मनोरुग्णालय प्रशासन आणि राजरत्न प्रतिष्ठान यांच्या प्रयत्नाने मोकळ्या वातावरणात खुल्या आकाशाच्या खाली मनसोक्‍त फिरता आले. यावेळी रुग्णांच्या चेहर्‍यावर उमटलेले स्मितहास्य पाहून त्यांनाही आनंद झाला.

शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात 229 मानसिक रुग्ण आहेत. यातील काही रुग्णांना त्यांचे नातेवाईक भेटण्यासाठी येतात. सणासुदीला त्यांना आपल्या घरी नेतात. परंतु, 50 रुग्णांचे कोणतेही नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी येत नाहीत. जिल्ह्यात भटकणार्‍या वेडसर व्यक्‍तींना पोलिसांनी आणि सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांनी मनोरुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या कोणताच ठावठिकाणा समजलेला नाही. त्यामुळे ते आपल्या नातेवाईकांपासून दूर आहेत. रुग्णालयाचा चार भिंती याच त्यांच्या जीवनाच्या सीमा आहेत. या रुग्णांनाही बाहेरच्या जगात फिरता यावे, यासाठी मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांच्या संकल्पनेतून सलग तीन वर्षे सहल उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रथम नाणीज येथे तर गतवर्षी गणपतीपुळे येथे सहल नेण्यात आली होती. यंदाच्या वर्षी पावस येथील स्वामी स्वरुपानंद मठ, गणेशगुळेतील गणपती मंदिर आणि बीचवर त्यांना नेण्यात आले. या उपक्रमातून मानसिक स्थिती ठिक नसलेल्या रुग्णांनी एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवला. या उपक्रमासाठी रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानचे त्यांना सहकार्य लाभले. या रुग्णांसोबत प्रतिष्ठानच्या कोमल कदम या सुद्धा सहलीत सहभागी झाल्या होत्या. या सहलीचे यशस्वी आयोजन डॉ. अविनाश ढगे, नितीन शिवदे, अभिजीत आग्रे, मिलींद भागवत यांनी केले.