Fri, Jul 19, 2019 01:31होमपेज › Konkan › तापसर रोखण्यासाठी २२ डॉक्टरांची फौज तैनात

तापसर रोखण्यासाठी २२ डॉक्टरांची फौज तैनात

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 11:10PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी

तापसर , लेप्टो साथ रोखण्यासाठी जिल्ह्यात 22 डॉक्टरांची फौज तैनात करण्यात आली असून लवकरच नवीन तपासणी लॅब सुरू करून आवश्यक सक्षम यंत्रणा उभारत असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर सांगितले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ओरल तपासणी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  तोंडाचा कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी हा कक्ष उघडण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.व्ही.कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील, डॉ.ज्ञानेश्‍वर दुर्भाटकर, डॉ.तिवारी, डॉ.समीर धाकोरकर तसेच तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, नारायण राणे, भारती मोरे, शिवानी पाटकर, मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, रश्मी माळवदे आदी उपस्थित होते.

भविष्यात लेप्टो तथा तापसर  रोखण्यासाठी शेतात काम करणारे शेतकरी व शेतमजुरांना शासन वैशिष्ट्यपूर्ण निधीतून हँडग्लोज व गमबुट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.  सांगली येथील अभिजित कोथळे हत्त्याप्रकरणी पोलिस यंत्रणा सक्षमपणे तपास करत आहे. तसेच सरकारी वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्‍तीही करण्यात आली आहे. त्यामुळे कोथळे कुटुंबीयांना शंभर टक्के न्याय मिळणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.  

संघटनेत ढवळाढवळ नाही

शिवसेना पक्षसंघटना ही शाखाप्रमुखांवर चालते. योजनांत सकारात्मक भाग घेवून समाजकारण करताना जनतेचे भले झाले पाहिजे त्यामुळे पक्ष संघटनेत आपण ढवळाढवळ करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष संघटनेबाबत सर्वोच्च निर्णय हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे असून संघटना सचिव तथा खा. विनायक राऊत हे सक्षमपणे संघटना बांधणी करत असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.