Sun, Aug 25, 2019 03:37होमपेज › Konkan › तहानलेल्या 167 वाड्यांना 21 टँकर

तहानलेल्या 167 वाड्यांना 21 टँकर

Published On: Feb 06 2018 11:03PM | Last Updated: Feb 06 2018 9:16PMरत्नागिरी : प्रतिनिधी

येऊ घातलेल्या उन्हाळ्यात भेडसावणार्‍या  पाणीटंचाईसाठी 98 गावांमधील 167 वाड्यांसाठी 21 टँकरद्वारे करण्यात येणार्‍या    पाणीपुरवठ्यासाठी आणि नळपाणी योजनांबरोबरच विंधन विहिरींच्या दुरुस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या दोन कोटी 78 लाख रुपयांच्या आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. 

गतवर्षी पावसाने कशीबशी सरासरी गाठली होती.  त्यामुळेे यंदाच्या उन्हाळ्यातही जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता भासण्याची शक्यता होती तर प्रशासनाने मान्यता दिलेल्या विविध पाणी योजनांबरोबरच   जलयुक्‍त शिवार योजना राबविताना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि कागदावरच उद्दिष्टपूर्तता केलेल्या वनराई बंधार्‍यांमुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या शतकी मजल गाठण्याची शक्यता आहे. 

पाणीटंचाईचे आराखडे तयार

सर्व तालुक्यांतून पाणीटंचाई  आराखडे तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, नियोजनात निधीची ओरड झाल्याने हे आराखडेही उशिराने देण्यात आले.  या आराखड्यात 98 गावांत पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. यातील 167 वाड्या तहानलेल्या राहणार आहेत. त्यांपैकी अपुर्‍या निधीअभावी रखडलेल्या तेरा नळपाणी योजनांची दुरूस्ती झाल्यास यातील 50 टक्के  गावे कमी होणार आहेत. त्यासाठी 21 टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, तहानलेल्या गावांतील पाणीटंचाईच्या निवारणार्थ सव्वा कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.  त्याचबरोबर नळपाणी योजनांबरोबरच  विंधन विहिरींच्या दुरूस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या दोन कोटी 78 लाखांच्या टंचाई आराखड्याला प्रशासनाने मान्यता दिली आहे.