Sun, Mar 24, 2019 12:26होमपेज › Konkan › फळबाग योजनेचे 166 प्रस्ताव चार वर्षे धूळखात 

फळबाग योजनेचे 166 प्रस्ताव चार वर्षे धूळखात 

Published On: Sep 06 2018 10:08PM | Last Updated: Sep 06 2018 10:04PMओरोस : प्रतिनिधी

रोजगार हमी फळबाग लागवड योजनेंतर्गत मालवण तालुक्यातून 2014 मध्ये प्राप्त 325 प्रस्तावांपैकी 166 प्रस्ताव गेली चार वर्षे धुळखात पडले आहेत. डाटा ऑपरेटर नसल्याने सदर प्रस्ताव रखडल्याचे समजते. मात्र याचा नाहक त्रास व भुर्दंड सदर लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. याला राज्य शासन कृषी विभाग जबाबदार असल्याचा आरोप सदस्य महेंद्र चव्हाण यांनी बैठकीत केला.

जि.प.कृषी समिती बैठक बॅ.नाथ पै समिती सभागृहात सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदस्य संजना सावंत, समीधा नाईक, महेश चव्हाण, वर्षा पवार, पल्‍लवी राऊळ, गणेश राणे आदींसह सचिव कृषी अधिकारी चव्हाण, खातेप्रमुख उपस्थित होते.

कृषी विभागाच्या वैयक्‍तिक लाभाच्या विविध 17 योजनांचे साडे तीन हजार अर्ज प्राप्त झाले असून प्रत्येक योजनेतील लाभार्थी  जि.प.सदस्यांनी सूचवावेत, अशी सूचना सभापती रणजीत देसाई यांनी दिल्या. यावर सदस्यांच्या शिफारशीनुसार लाभार्थी निश्‍चित होतात. त्या लाभार्थीची सदस्यांच्या शिफारसीसाठी त्या त्या ग्रा.पं.कडे तालुका स्तरावरून पत्र पाठवावी अशी सूचना सदस्य गणेश राणे यांनी केली.

कृषी यांत्रिकी योजनेंतर्गत राज्य कृषी विभागाकडे  बांव येथील सत्यवान परब यांचा अर्ज गहाळ झाल्याने लाथार्थी अनुदानापासून वंचित राहिल्याने यांची राज्य कृषी विभागाने दखल घ्यावी, अशी सूचना सभापती रणजित देसाई यांनी दिली.

प्राप्त वैयक्‍तिक लाभाच्या योजना ज्या लाभार्थी शिल्‍लक राहतील. त्यांना सुधारीत अंदाजपत्रकीय तरतुदीतून लाभ देण्याचे सूचित करताना वैयक्‍तिक लाभाचे प्रस्तावही संख्या वाढत असून योजनांची संख्याही वाढती असून आवश्यक तरतुदी कमी होत असल्याने प्राप्त प्रस्तावातील सर्वांनाच लाभ देणे शक्य होत नसल्याचे स्पष्ट केले. 

मच्छीमारांसाठी योजना
स्थानिक मच्छिमारांना वैयक्‍तिक लाभाच्या योजना देण्याचा निर्णय जि.प.सर्वसाधारण सभेत झाला असून अशा लाभार्थींना ग्रा.पं.विभागामार्फत वैयक्‍तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार असल्याचे सूचित केले. सदस्य हरी खोबरेकर यांनी मच्छिमारांसाठी वैयक्‍तिक लाभाच्या योजना कृषी विभागामार्फत राबविण्याची मागणी केली होती. त्या प्रश्‍नावर सभापती रणजित देसाई यांनी सूचित  केले.