Tue, Nov 13, 2018 23:27होमपेज › Konkan › कोकणातील चार किल्ल्यांसाठी 16 कोटी

कोकणातील चार किल्ल्यांसाठी 16 कोटी

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 14 2018 11:13PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

कोकणात अनेक किल्‍ले आहेत. मात्र, यातील काही किल्ल्यांची दुरवस्था झाली असून त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून चार किल्ल्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. यासाठी 16 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोकण हे किल्ल्यांचे आगर आहे. सार्‍या कोकणात किल्ल्यांचे जाळे पसरलेले आढळते. कोकणातील अनेक किल्ले शिवपूर्वकालापासून अस्तित्वात आहेत. यशवंतगड, रेडी, भरतगड, बाणकोट किल्ल्यांच्या दुरुस्तीच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पूर्णगड किल्ल्याच्या कामाची निविदा काढण्याचे काम सुरू आहे. 

किल्ल्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने आज अनेक किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन गड-किल्लेप्रेमींमार्फत शासनाकडे डागडुजी करण्याची मागणी होत आहे. इतिहासाची साक्ष देणार्‍या वास्तूंचे संवर्धन व्हावे, यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. तिच्यामार्फत किल्ल्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देण्यात येणार आहे. बाणकोट किल्ल्याच्या तटबंदीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून पायर्‍यांचेही काम करण्यात येणार आहे तर पूर्णगड किल्ल्याची दुरुस्ती, साफसफाई करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गमधील भरतगड, रसाळगड (रेडी किल्ला) यांचीही डागडुजी, अंतर्गत रस्ते, पाण्याची सुविधा आदी कामे करण्यात येणार आहेत. काही महिन्यांत या किल्ल्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे तर पूर्णगड किल्ल्याच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निविदा प्रक्रिया काढण्याचे काम सुरू असल्याचे पुरातत्त्व विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.