Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Konkan › १५२ गावे जोखीमग्रस्त म्हणून जाहीर

१५२ गावे जोखीमग्रस्त म्हणून जाहीर

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 10:36PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

पावसाळी कालावधीत साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील आठही तालुक्यात मिळून एकूण 152 गावे जोखीमग्रस्त गावे म्हणून निश्‍चित करण्यात आली आहेत. यामध्ये 77 लेप्टोस्पायरोसिसची साथ येणारी गावे व 53 पूर येणार्‍या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये प्रतिबंधक उपाय योजना हाती घेण्यात आली आहे. या गावांसह जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सुरळीत रहावी, यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष 1 जूनपासून सुरू करण्यात येणार असून हे कक्ष सप्टेंबरपर्यंत 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. योगेश साळे यांनी दिली.

येत्या पावसाळी मोसमात जिल्ह्यात साथीचे आजार उद्भवू नयेत आणि ते उद्भवले तर त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पाऊस आला की, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू तसेच साथीचे विविध आजार उत्पन्न होतात. हे आजार उत्पन्न होऊ नयेत. तसेच हे आजार उत्पन्न झालेच तर त्यावर नियंत्रण मिळविता यावे यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत सर्वतोपरी दक्षता घेतली जाते. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा आरोग्य विभागामार्फत साथरोग जोखीमग्रस्त गावांची निश्‍चिती केली जाते आणि पाऊस पडण्याअगोदर पासूनच सर्व उपाययोजना केली जाते.