Wed, Sep 26, 2018 20:02होमपेज › Konkan › रेडीत 150 काजू कलमे आगीत भस्मसात 

रेडीत 150 काजू कलमे आगीत भस्मसात 

Published On: Mar 21 2018 10:51PM | Last Updated: Mar 21 2018 10:44PMआरवली : वार्ताहर 

रेडी- गावतळे - आरोंदा रस्त्यानजीकच्या काजू बागेला लागलेल्या आगीत सुमारे 150 काजू कलमे जळून सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले. रेडी ग्रामस्थ व वेंगुर्ले नगरपरिषद अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली . 

रेडी- आरोंदा रस्त्यानजीकच्या रेडी सरपंच रामसिंग राणे यांची काजू बाग आहे. बुधवारी सकाळी 10-30 ते 11 वा. च्या सुमारास या बागेला अचानक आग लागली. कडक ऊन व वार्‍यामुळे क्षणार्धात ही आग सर्वत्र पसरली. आगीचे रौद्ररूप पाहून ग्रामस्थांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास याची माहिती दिली. दरम्यान , ग्रामस्थांनी तेथील कंपनीच्या टँकरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. अखेर वेंगुर्ले नगरपरिषदेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दुपारी  1. 15 वा. च्या सुमारास आग आटोक्यात आली.

मात्र , तोपर्यंत श्री. राणे यांची सुमारे दिडशेपेक्षा अधिक मोहोरलेली काजू  कलमे जळून खाक झाली. यात त्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रा. पं. सदस्य विनायक नाईक, नामदेव राणे, गोपाळ राणे, विश्राम राणे, सदाशिव राणे, पुरूषोत्तम राणे, सागर राणे, शेखर वारखणकर यांच्यासह रेडी ग्रामस्थ व वेंगुर्ले नगरपरिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी लक्ष्मण जाधव, उमेश वेंगुर्लेकर, दिनेश वेंगुर्लेकर, संदेश जाधव यांनी  प्रयत्न केले. जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ व वेंगुर्ले पं. स. सदस्य मंगेश कामत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली .