Sun, May 26, 2019 08:41होमपेज › Konkan › देवरूखसाठी १५ कोटींची पाणी योजना

देवरूखसाठी १५ कोटींची पाणी योजना

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 8:22PMसंगमेश्‍वर : वार्ताहर 

दिवसेंदिवस देवरूख शहराची लोकसंख्या वाढत आहे. हे विचारात घेता नगर पंचायतीने सादर केलेल्या 15 कोटी 84 लाख रुपयांच्या नव्या पाणी योजनेला लवकरच मंजुरी देणार असल्याची घोषणा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली.

मंत्रालयातील त्यांच्या दालनात देवरूखच्या विकासकामांबाबत झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली शिवाय इतर विकासकामांबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती नगराध्यक्ष नीलेश भुरवणे यांनी दिली. देवरूख शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्याचा परिणाम लोकसंख्येवर होत असून त्यामध्येही वाढ झाली आहे.

सध्या शहराला पाणीपुरवठा करणारी योजना अपुरी पडू लागली आहे. ग्रामपंचायत असताना 1990 साली ही योजना होती. त्यानंतर 1995 साली तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र माने यांनी ती विस्तारित केली. त्यानंतर मात्र या योजनेला निधी आलाच नाही. त्यामुळे ही योजना सध्या कालबाह्य होत निघाली आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून शहरातील सर्वेक्षण करत नव्या नळपाणी योजनेचा आराखडा बनवला. एकूण 15 कोटी 84 लाख रुपयांचा हा आराखडा आहे. हा आराखडा मंजुरीसाठी तसेच इतर विकास कामासंदर्भात मंत्रालयात नुकतीच बैठक पार पडली आहे.

या बैठकीला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी आमदार विनय नातू, भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांच्यासह नगरविकास विभागाचे तसेच इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रथम नव्या नळपाणी योजनेसंर्भात चर्चा करण्यात आली. या योजनेसाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासन रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिले.

नगर पंचायत इमारतीसाठीही लवकरात लवकर निधी मिळावा तसेच कायमस्वरुपी मुख्य कार्यकारी अधिकारी मिळावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही गोष्टींची पूर्तता तातडीने करण्याचे आश्‍वासन ना. रवींद्र चव्हाण यांनी दिले. ही पाणी योजना मार्गी लागल्यास देवरूख शहराचा पाणीप्रश्‍न मिटणार आहे.