Mon, Jun 24, 2019 21:43होमपेज › Konkan › महाराष्ट्र दिनी सिंधुदुर्गनगरीत 15 उपोषणे

महाराष्ट्र दिनी सिंधुदुर्गनगरीत 15 उपोषणे

Published On: May 03 2018 1:29AM | Last Updated: May 02 2018 11:34PMओरोस : प्रतिनिधी

आपल्या न्याय मागण्यांसाठी योग्य न्याय मिळावा म्हणून जिल्ह्यातील 15 उपोषणकर्त्यांनी महाराष्ट्र दिनी सिंधुदुर्गनगरीत उपोषणे केली. अद्याप प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने अनेकांनी कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्‍त केली.  यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12, पोलिस अधीक्षक कार्यालय 2 तर जि. प. समोर 1 अशी 15 उपोषणे करण्यात आली. 
सांडपाण्याची दुर्गंधी

देवबाग येथील महादेव केळूसकर यांनी सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे आपल्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना त्वचारोगाचा आजार झाला आहे.  या त्रासाला कंटाळून अनेकवेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही कार्यवाही केली नाही. आश्‍वासनापलिकडे प्रशासनाने काही केले नाही. सांडपाण्याचा योग्य तो बंदोबस्त करावा यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.   

वृक्षतोडीवर कारवाई करा

नाणेली येथील आपल्या मालकीच्या जमीनीतील 11 मोठी झाडेतोडून चोरून नेल्याची तक्रार एप्रिल 2012 मध्ये करुनही वनक्षेत्रपाल कुडाळ हे कारवा इ करत नसल्याच्या निषेधार्थ  व्यंकटेश धुरी व कुटुंबीयांनी उपोषण केले. याबाबत वनअधिकारी कुडाळ याच्या न्यायालयीन आदेशानुसार संबंधितांनी सादर केलेले बंद पत्र ग्राह्य मानून वृक्षतोड ही दुसर्‍या सर्व्हे नंबर मधील असल्याचा निर्णय देण्यात आला. वनपाल माणगांव यांनी 28 ऑक्टोबर 2015 रोजी या लाकडाचा निर्गती परवाना पारित केला होता. दरम्यान वन अधिकारी कुडाळ यांच्या न्यायालयीन निर्णयाविरोधात सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक यांच्या न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. मात्र याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप मिळालेला नाही असे धुरी यांनी सांगितले. माहिती अधिकारात माहिती मागूनही ती देण्यात आलेली नाही. तक्रारीमुळे माल वन खात्यात अडवून ठेवला आहे. चुकीच्या पध्दतीने वृक्षतोड करणार्‍यांवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी व्यंकटेश धुरी, पंढरीनाथ धुरी यांनी केली आहे.

जमिनीच्या ताब्यासाठी धरणग्रस्तांचे उपोषण

आयनोडे धरणग्रस्त असल्याने साटेली-भेडशी येथील सर्व्हे नं. 37/4 येथील संपादीत जमीन पर्यायी शेत म्हणून देण्यात आली. मात्र या जमीनीचे मुळ मालक दशरथ धर्णे हे या जमीनीचा ताबा देण्यास अडथळा करीत असल्याचा आरोप सदाशिव सावंत यांनी केला आहे. 2004 साली रितसर सातबारा होऊनही व पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांनी ताबा देण्याबाबत तहसीलदार यांना आदेश देऊनही त्याचे तहसीलदारांकडूनअद्याप पालन झाले नाही. 17 वर्षे ही प्रक्रीया अडकली असल्याने कुटुंबाचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान भरपाईसह जमीनीचा ताबा मिळावा अशी मागणी केली आहे. 

अधिमूल्य रक्‍कम कमी करा

बिनशेती जागेवरील निवासी घरावर पहिला मजला बांधण्यासाठी मागितलेली परवानगी देण्यापूर्वी 2 लाख 41 हजार 500 रू. अधिमूल्य जमा करण्याचे आदेश बजावण्याचा गजब कारभार जिल्हा प्रशासनाने केला असल्याचा आरोप बांदा-देऊळवाडी येथील लक्ष्मण पावसकर यांनी केला आहे. बिनशेती जागेत 12 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या घराच्या स्लॅबवर दुसरा मजला बांधण्याबाबतची परवानगी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे मागण्यात आली होती. मात्र, नगररचना कार्यालयाने ही परवानगी देण्यापूर्वी 2 लाख 41 हजार 500आकारण्यात आलेल्या अधिमुल्य सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडणारे आहे. त्यामुळे ही अधिमुल्य रक्कम रद्द करावी या मागणीसाठी लक्ष्मण पावसकर यांनी उपोषण केले. 

शौचालय पाडल्याबाबत 

कांदळगाव येथील आपल्या घरात शौचालय व बाथरूमचे काम करण्यात आले. मात्र, 22 मे 2014 रोजी ग्रा. पं. ने ते पाडले. याबाबत प्रशासनाकडे अनेकदा लक्ष वेधण्यात आले. परंतू अद्याप कार्यवाही नाही, या मागणीसाठी येथील विनोद राणे, विनिता राणे यांनी 26 जानेवारी 2016 रोजी उपोषण केले व त्यावेळी आश्‍वासनाची पूर्तता नाही. त्यानंतर कोकण आयुक्तांच्या लोकशाही दिनात दिलेले आदेशाची कार्यवाही होत नाही, मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केल्याचे मुख्यमंत्री यांना सांगून दिशाभूल करत असल्याचा आदेश श्री. राणे यांनी केला व संबंधित गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

रस्त्यासाठी उपोषण

होडावडा दुरेकरवाडी येथे जाण्यासाठी आठ फुटी रस्त्याची कारवाई करण्यात यावी या तहसीलदारांच्या आदेशाला होडावडा ग्रा. पं. ने केराची टोपली दाखवली. मात्र प्रांत, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांचेही ग्रा. पं. ऐकत नाही असा आरोप आनंदीबाई जोशी यांनी करत आपल्या घरी जाणारा रस्ता होत नसल्याने वाहन जात नाही. यामुळे डॉक्टरांची सेवा तसेच घर दुरूस्तीच्या कामामध्ये अडथळे येत आहे. वाहतुकीस मार्ग खुला करा या मागणीसाठी आनंदीबाई जोशी यांनी उपोषण केले. 

किमान वेतनासाठी कामगारांचे साखळी उपोषण

जिल्ह्यातील कंत्राटी कामगार मागील 10 ते 12 वर्षापासून किमान वेतनापासून वंचित आहेत. प्रॉव्हिडंट फंड, इन्शुरन्स, गणवेश व इतर साहित्याचा लाभ मिळत नाही. अवैद्यकीय कंत्राटी कामगारांची पिळवणूक होत आहे. एक ठेकेदार असूनही कामगारांना कमी-जास्त मासिक वेतन दिले जाते. या सर्व समस्या दूर कराव्या या मागणीसाठी कास्ट्राईब कल्याण कर्मचारी महासंघाने उपोषण करत अवैद्यकीय कंत्राटी कर्मचार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले. या उपोषणास शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी भेट दिली. 

इन्सुली ग्रा. पं. 2015 साली भ्रष्टाचार केलेल्या ग्रामसेवक पुन्हा याच ग्रा. पं. तीत नियुक्त केला गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या या भ्रष्टाचारी कर्मचार्‍याला पाठीशी घालणार्‍या कार्यपध्दतीचा निषेधही विकास केरकर  व ग्रामस्थांनी जि. प. समोर उपोषण केले. ग्रामविकास अधिकारी एन. आर. तांबे यांचेवर जिल्ह्यातील विविध ग्रा. पं. मधून काम करताना 44 लाख 54 हजार 496 रूपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवला. तसेच 2015 मध्ये इन्सुली ग्रा. पं. तीत कार्यरत असताना या ग्रा. पं. तीत त्यांनी 2 लाख 65 हजार रूपयाचा अपहार केला होता. याबाबतचे पुरावे सादर केले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांनी एन. आर. तांबे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र अपहार केलेल्या ग्रा. पं. तीतच पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. या उपोषणाला पालकमंत्री दीपक 
केसरकर यांनी भेट दिली व प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. 

जमीनीवर वारस नोंद होण्यासाठी उपोषण 

कुळ म्हणून नाव लागले कुळ कायदा कलम 32 नुसार 1966 नुसार त्याच्या स्वसंपादीत म्हणून या जमीनी लागल्या. मात्र आता त्यांना मृत दाखवून त्याच्या खात्यात भलत्याच मंडळींची नावे लागली जी 1954 पासून मुंबईला वास्तव्यास आहेत. या जमिनीवर आपली व मुलांची वारस म्हणून नाव दाखल करावी अशी मागणी मालोजी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. याप्रकरणी ग्रा.पं. नेही आपल्या मुलांना रहिवासी दाखला देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे विविध कामे अडकून पडली आहेत. अनेक अडचणींमुळे कर्ज फेडणेही मुश्किल झाले आहे, याबाबत न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

चुकीच्या उपचाराने पत्नीचा मृत्यू 

वेंगुर्ले ग्रामीण रूग्णालयात सौ. नीलम जितेंद्र राऊळ यांनी 26 फेब्रुवारी 2014 रोजी कुटुंबकल्याण स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर तिची तब्येत खालावल्याने तिला गोवा येथे पाठविण्यात आले होते. मात्र 22 मार्च रोजी उपचारादरम्यान गोवा येथे तिचा मृत्यू झाला. वेंगुर्ले ग्रामीण रूग्णालयाचे डॉक्टर उबाळे हे सर्वस्वी जबाबदार आहेत असा आरोप मयत निलम हिचे पती जितेंद्र राऊळ यांनी केला असून चुकीच्या उपचार पध्दतीमुळे आपल्या पत्नीचा बळी गेल्यावने संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी श्री. उबाळे यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक  करावी या मागणीला न्याय मिळाला नाही. त्याची दखल घ्यावा यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. 15 दिवसात कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. आंबोली ग्रा. पं. हद्दीतील नांगरतास धनगरवाडी रस्ता ग्रा. पं. दप्तरी नोंद आहे. मात्र, गणपत पाटील व अन्य अतिक्रमण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत न्याय मागण्यांसाठी उपोषण केले. 

महामार्ग अपघातग्रस्तांना मदत द्या

मुंबई-गोवा महामार्गावर नुकत्याच झालेल्या ज्ञानेश्‍वर ताम्हाणेकर याच्यासह अन्य पाच जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी महामार्गाचे काम करणार्‍या कंपनीसह कार्यान्वित यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व संबंधित अपघातग्रस्तांना मदत मिळावी, या मागणीसाठी लाईफ ऑफ फ्रीडम फाऊंडेशनने उपोषण केले.वेतोरे सरपंच, ग्रामसेवकांवर कारवाईसाठी 

श्री. नाईक यांचे उपोषण 

देवस्थान व जमिनीतील कुळांना अंधारात ठेवून वेतोरे हरिजनवाडी येथे अनधिकृत साकव बांधणीचा घाट वेतोरे वरचीवाडी ग्रा. पं. ने केला आहे, असा आरोप संदीप नाईक यांनी केला आहे. या साकवाकडे जाणारा रस्ता व मुख्यरस्ता हा संपूर्णपणे देवस्थान मालकीचाआहे. भविष्यात तो बंद केला तर साकवासाठी होणारा लाखो रूपये वाया जाणार आहे. यासाठी संदीप नाईक यांनी उपोषण केले. भरदिवसा घरफोडी करून दागिने लंपास करणार्‍या चोरांचा छडा लावण्यास पोलीस असमर्थ ठरले असल्याचा आरोप करत लवकरात लवकर चोराचा तपास व्हावा या मागणीसाठी ओरोस खुर्द येथील धाकू मेस्त्री यांनी पत्नीसह पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. 

Tags : Konkan, 15, accusations, Maharashtra Day