Mon, Mar 25, 2019 17:28होमपेज › Konkan › गुहागरमधील १४ गावांना दरडींचा धोका

गुहागरमधील १४ गावांना दरडींचा धोका

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 03 2018 10:43PMगुहागर : प्रतिनिधी

नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षाच्यावतीने गुहागर तालुक्यातील 14 गावांना दरडीचा धोका असल्याची नोंद केली आहे. पावसाळ्यापूर्वी आपत्ती नियंत्रण यंत्रणेमार्फत प्रत्येक तालुक्यातील दरडग्रस्त गावांची यादी बनविण्यात येत आहे. गुहागरमध्ये समुद्र किनारपट्टीलगत चक्रवादळाचा धोका असलेल्या गावांचीही नोंद झाली आहे.

दरवर्षी नैसर्गिक आपत्ती नियंत्रण यंत्रणेमार्फत तालुकानिहाय दरडग्रस्त, चक्रीवादळ व पूरग्रस्त गावांची यादी तयार करण्यात येते. या अंतर्गत प्रत्येक  आपत्तीग्रस्त गावात आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येते. या वर्षीही गुहागर तालुक्यातील 14 गावांना दरडीचा धोका असल्याची नोंद करण्यात आली आहे. उंच भागात वस्ती असलेल्या व वस्तीच्या शेजारी असलेल्या दरडीची गावे यामध्ये आहेत. या गावांवर नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षाचे विशेष लक्ष असणार आहे. येथील तहसील कार्यालयाने तसा अहवाल तयार केला आहे. 

तालुक्यातील दरडग्रस्त गावांमध्ये पाचेरीसडा, पाचेरीआगर, भातगाव, आंबेरी खुर्द, असोरे, घरटवाडीतर्फे वेलदूर, नवानगर, धोपावे, तवसाळ खुर्द, पडवे, काताळे, कोळीवाडी, चरळकेवाडीतर्फे धोपावे, वडद, काजुर्ली या गावांचा समावेश आहे. तालुक्यात पूरग्रस्त गावे नाहीत. मात्र, तालुक्याला समुद्रकिनारा असल्याने चक्रीवादळसदृश गावांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये अंजनवेल, आरे, गुहागर, असगोली, पालशेत, अडूर, कोंडकारुळ, वेळणेश्‍वर, साखरीआगर, हेदवी, नरवण, तवसाळ खुर्द, तवसाळ, पडवे, कुडली या गावांचा समावेश आहे. 

खाडीलगतच्या वेलदूर, धोपावे, साखरी त्रिशुळ, म्हस्करवाडीतर्फे साखरीत्रिशूळ, कारुळ, विसापूर, पांगारीतर्फे हवेली, पेवे, भातगाव, परचुरी खुर्द व कोळवली या गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.